आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court's Headquarters Are In Confusion, Leaving MD

मुख्यालय सोडून एमडी करताहेत कोर्टाच्‍या वार्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा बँकेच्या कायदेविषयक बाबी सांभाळण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि कायदेतज्ज्ञांचे पॅनल नियुक्त केले आहे. खंडपीठात दाखल खटल्यांबाबत लक्ष घालण्याची जबाबदारी या विभागावर असली तरी खंडपीठातील अनेक छोट्या-मोठय़ा खटल्यांसाठी गेल्या चार महिन्यांपासून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख स्वत: औरंगाबादच्या वार्‍या करीत आहेत. या प्रकारांमुळे आपल्यावर विश्वास नसल्याची भावना काही अधिकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, ते बँकेत उपस्थित राहत नसल्याने बँकेची कामेही रखडली आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्मचारी भरती, संचालक मंडळ बरखास्त करणे, रावेर कारखाना विक्रीला स्थगिती देण्यासह विविध विषयांवरील खटले औरंगाबाद खंडपीठात सुरू आहेत. या खटल्यांसाठी बँकेतर्फे वकील नेमणे आणि खटल्यांच्या तारखांना उपस्थित राहण्याची जबाबदारी बँकेच्या विधी शाखेच्या अधिकार्‍यांवर आहे; मात्र या विभागांच्या अधिकार्‍याऐवजी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख स्वत: औरंगाबादच्या चकरा मारत आहेत. कर्मचारी भरतीप्रकरणी दाखल याचिकेसंदर्भात ते बुधवारी औरंगाबादला गेले होते. त्यांनी खंडपीठातील खटल्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने त्या विभागातील अधिकार्‍यांची देखील पंचाईत झाली आहे.
कार्यालय पडले ओस
कधी औरंगाबाद येथे गेल्याचे तर कधी रजेच्या कारणाने व्यवस्थापकीय संचालक कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांना कामानिमित्त भेटण्यासाठी कार्यालयात येणार्‍यांची गैरसोय होत आहे. त्याचा फटका खुद्द जिल्हा उपनिबंधक संजय राऊत आणि जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांना बसला आहे. अनेक संचालक आणि अधिकार्‍यांना देखील कामासाठी त्यांचा बाहेरच शोध घ्यावा लागतो.
विश्वास नसल्याची कर्मचार्‍यांमध्ये भावना निर्माण
बॅँकेची कामे रखडली
संगणकीकरणप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तपासासाठी पोलिसांना काही कागदपत्रांची आवश्यकता आहे, तर रावेर कारखाना विक्रीप्रकरणी विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांमार्फत बँकेकडून लेखी खुलासा मागवला आहे. व्यवस्थापकीय संचालक रजेवर असल्याचे कारण सांगत या दोन्ही गोष्टी देण्यास बँकेच्या इतर अधिकार्‍यांनी असर्मथता दर्शवली आहे. यासह बँकेची इतर कार्यालयीन कामे देखील रखडली आहेत.