आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकष न बघता फटाके विक्रीचे परवाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अवैध फटाकेसाठा करून नफेखोरी करणार्‍यांची संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासनाने मात्र कुठलेही निकष न बघता सर्रास फटाके विक्रीचे परवाने देण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसात जिल्हा प्रशासनाने 190 परवाने दिले आहे.

पोलिसांकडून नाममात्र कारवाई
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शहरातील 20 लाखांचा अवैध फटाक्यांचा साठा जप्त केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही पहिलीच कारवाई आहे. परवानगीपेक्षा अधिक पटीने फटाक्यांचा साठा ठेवल्यामुळे ही कारवाई झाली आहे. प्रशासनाकडून परवानगी देताना पुरेसे निकष पाहिले जात नाही, यामुळे या प्रकारांना चालना मिळत आहे. मात्र किरकोळ कारवाईनंतर पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते.

चलन भरल्यानंतर सहज परवाना
फटाके विक्री परवान्यासाठीचे निकष व नियमावली नागपूरच्या चीफ कंट्रोल रूममधून तयार केले जातात. परवान्यासाठी विक्रेत्यांना एकवीस निकष असलेले पत्रच दिले जाते. मात्र या निकषाप्रमाणे कुठलीही चौकशी न करता चलन भरलेल्यांना सर्रासपणे परवानगीपत्र दिले जाते. जिल्ह्यात 650 परवाने तर शहरात 56 परवाने दिले होते असे गृह विभागाने सांगितले. फटाके विक्री पूर्वी पाण्याचे टँकर, अग्निशमन यंत्र बसविणे गरजेचे आहे. मात्र या सूचनांकडे व्यावसायिकही दुर्लक्ष करतात, तर प्रशासनाकडूनही सक्ती केली जात नाही. परवानगी देतेवेळेस व व्यवसाय थाटल्यानंतर यासंबंधीची चौकशी केल्यास अप्रिय घटना टळतील.

सहज मिळवा परवाना
गृह विभागातून अर्ज भरून 500 रुपयांचे चलन भरल्यास फटाके विक्रीचा परवाना दिला जातो. यास शहरासाठी महापालिकेचे नाहरकत दाखला तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला व स्थानिक पोलिस शाखेचा नाहरकत दाखला आवश्यक असतो. हे दाखलेही सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने चीफ कंट्रोल बोर्डाने तयार केलेल्या नियमावली बाबत तसेच फटाके विक्रीची जागा, सुरक्षितता या मुद्यांकडे दुर्लक्ष केले जाते. किरकोळ विक्रेत्यांना 25 किलोपर्यंत फटाके साठा तर घाऊक व्यावसायिकांना 500 किलोपर्यंत साठा करता येत असल्याचे गृहविभागाने सांगितले.