आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेन बिघडली; हायवे जाम, लोक हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबईच्या तळोजा एमआयडीसीतून नागपूरकडे जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या क्रेनमध्ये शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता महामार्गावरील बांभाेरी पुलावर अचानक बिघाड झाला. त्यामुळे तीन किलाेमीटरपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या हाेत्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांना प्रात्यक्षिक अंतर्गत परीक्षांना जाण्यासाठी उशीर झाला, तर अनेक नागरिकांना पायपीट करावी लागली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यास पाेलिसांना यश अाले.
अमेरिका येथील बनावटीची अन् नागालॅण्ड पासिंगचे क्रेन (एनएल-०२-के-७६२) मुंबईतील तळोजा एमआयडीसीतून नागपूरकडे जात होते. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावरून क्रेन मार्गस्थ हाेत असताना तिच्या स्टेअरिंग जॉइंटमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे चालक शकिल शेख याने क्रेन बंद केले. परिणामी, पाच मिनिटांतच पुलापासून दाेन्ही बाजूला वाहतुकीचा खाेळंबा झाला. अर्ध्या तासातच शहराकडील खोटेनगर तर विद्यापीठाच्या मुख्य गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, अशा परिस्थितीतही अनेक वाहनचालकांनी ओव्हरटेक करण्याचा बळजबरी प्रयत्न केल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला रांग वाढतच गेली. जीजे-०६-झेडझेड-६८८५ क्रमांकाच्या दुसऱ्या एका कंटेनरच्या मदतीने दुपारी १२.०५ वाजता बंद पडलेली क्रेन रस्त्यावरून हटवण्यात अाली. त्यानंतर महामार्गाचे वाहतूक पोलिस सहायक एम.एस. चव्हाण, वासुदेव पाटील, रईस पठाण, संतोष चौधरी, मुकेश साळुंखे यांनी दोन तास प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करताना पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.
उमविच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
वाहतुकीच्या कोंडीचा सर्वाधिक मोठा फटका उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या अप-डाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. माधुरी पाटील (कॉम्प्युटर सायन्स), अपूर्वा ससाणे (बीबीएम), पायल पाटील (एमबीए), माया देवरे, प्रिया पाटील, अक्षदा मेरिया (एमसीए) या विद्यार्थिनी रिक्षा, बसने प्रवास करून विद्यापीठात जात होत्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे त्यांनी बांभाेरी पुलापासून पायीच चालत विद्यापीठ गाठल्याने उशीर झाला. परिणामी, त्यांना प्रात्यक्षिक अंतर्गत परीक्षेला पाेहोचण्यास उशीर झाल्याने अपेक्षित वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या गुणांवर परिणाम होणार आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिल्या. या शिवाय अनेक विद्यार्थी, कर्मचारीदेखील उशिराने पोहोचले. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीदेखील रिक्षा, बसमधून खाली उतरून पायपीट करून खोटेनगर, बांभोरी ही ठिकाणे गाठली. तेथून नागरिक पुन्हा दुसऱ्या वाहनाने मार्गस्थ झाले. या प्रकारामुळे त्यांचा बराचसा वेळ वाया गेला.
रेल्वेच्या सेवेतील क्रेन
बंद पडलेली क्रेन ही अमेरिकन बनावटीचे आहे. तिच्या उजव्या हाताला स्टेअरिंग असून १२ चाके आहेत. मध्य रेल्वेच्या विकास प्रकल्पांसाठी अवजड वस्तू उचलण्याचे काम या क्रेनच्या मदतीने केले जाते. नागपूर येथील कामासाठी ही क्रेन निघाली अाहे. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्यामुळे पोलिसांनी क्रेनची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच रोख दंडही वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, क्रेन दुरुस्त करण्यासाठी मुंबई येथून कारागीर बोलावण्यात आले असून सहा-सात दिवसांत क्रेन दुरुस्त होईल, अशी माहिती चालक शकील शेख सहायक धमेंद्र कुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

नागरिकांनी नदीतून काढली वाट
तासन् तास वाट पाहूनही वाहतूक काेंडी सुटत नाही म्हणून अखेर नागरिकांनी कोरड्या झालेल्या गिरणा नदीतून वाट काढली हाेती. नगरिकांपाठोपाठ काही दुचाकीचालकांनीसुद्धा नदीतून चालवत दुसऱ्या बाजूला गाड्या काढल्या. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
बातम्या आणखी आहेत...