आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यांत ७३ वी सोनसाखळी लांबवली, पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात चोऱ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आदर्श नगरातील आयडीबीआय बँकेसमोर शुक्रवारी सकाळी ६.१५ वाजता मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या एका महिलेची ३५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजे सकाळी ६.३५ वाजता नवीन बसस्थानकातील पार्सल कार्यालयासमोरून यावलला जाणाऱ्या एका महिलेची ५० हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून पोबारा केला.
सातव्या महिन्यातील ही ७३ वी सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली आहे. या सर्व घटना पोलिस अधीक्षक कार्यालय पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर घडत आहेत, तरीदेखील पोलिसांना त्यांचा सुगावा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिलांना रस्त्याने फिरणे अवघड झाले आहे. याबाबत 'दिव्य मराठी'ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. यात महिनाभरात घडलेल्या घटनांबाबत माहिती देण्यात आली होती. शुक्रवारीदेखील २० मिनिटांत दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

मॉर्निंग वॉक ३५ हजारांत
आदर्श नगरातील व्यावसायिक नारायण मणियार यांच्या पत्नी श्रीकांत मणियार (वय ५२) या शुक्रवारी मेहरूणकडे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सकाळी ६.१५ वाजता त्या परत येत असताना आदर्शनगर पोलिस चौकीसमोर असलेल्या आयडीबीआय बँकेजवळ त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या बजाज पल्सर गाडीवरून दोन तरुण गेले. काही मिनिटांत त्यांनी डी मार्टपर्यंत जाऊन गाडी वळवत त्यांच्या मागे आले. त्यांनी मणियार यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून नेली. मणियार यांनी आरडा-ओरड केली मात्र चोरटे गाडी जोरात रेस करत काव्यरत्नावली चौकाकडे निघून गेले.

जिल्हापेठ ठाण्याजवळून मोटारसायकल लंपास
जिल्हापेठ पोलिस ठाण्याजवळ असलेल्या संकल्प हॉस्पिटलमध्ये वन विभागाचे कर्मचारी विजय कडू बोराडे (रा.आहुजानगर) यांचा मुलगा उपचारासाठी दाखल आहे. त्यांनी गुरुवारी रात्री १० वाजता त्यांची बजाज पल्सर (एमएच- १९, बीएच- १३३५) मोटारसायकल हॉस्पिटलच्या बाहेर लावली होती. शुक्रवारी सकाळी ती मोटारसायकल चोरी झाली होती. याविषयी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी चोरी झालेल्या दोन्ही ठिकाणी बजाज पल्सरचाच चोरट्यांनी उपयोग केला आहे. त्यामुळे याच चोरीच्या मोटारसायकलवरून चोरट्यांनी सोनसाखळ्या चोरीचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

बसस्थानकातही मारला हात
यावल येथील रॉकेलचे विक्रेते महेश ठाणावाला त्यांच्या पत्नी मंदाकिनी ठाणावाला (वय ५४) हे गुरुवारी रात्री उशिरा आंबाजोगाई (जि. बीड) येथून नातेवाइकाला भेटून जळगावात परत आले. रात्री त्यांनी रामानंदनगरात त्यांच्या मुलीकडे मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता ते यावल येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात रिक्षाने आले. पार्सल कार्यालयाजवळून जात असताना त्यांच्यामागून काळ्या रंगाच्या पल्सरवर दोन तरुण आले. त्यांनी ठाणावाला यांची पर्स ओढली. त्यानंतर २० ग्रॅम वजनाची ५० हजार किमतीची सोनसाखळी जबरीने ओढून शिवतीर्थ मैदानाच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या गाडीची मागची नंबर प्लेट तुटलेली होती.