आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांच्या बॅगेत हात घालून ६५ हजार रुपयांवर डल्ला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावकरांनो, पैसे सोबत घेऊन घराबाहेर निघत असाल तर सावधान! कारण शहरात लूटमार करणारी महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीतील तीन महिलांनी गुरुवारी दुपारी ११.२० ते वाजेदरम्यान खासगी ट्रॅव्हल्सने जळगावात येणा-या कंडारीच्या महिलेचे २१ हजार, तर मोहाडी फाट्यावरून रिक्षात येणा-या सासू-सुनेचे ४३,८०० रुपये लंपास केले आहेत.
शहरात गुन्ह्यांचे सत्र थांबेना
शहरातचोरी, लूटमारी, हाणामारी, तणावाच्या घटना घडत आहेत.गुन्हेगारी रोखण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी अधिका-यांना कडक शब्दात सूचना दिल्या होत्या तरीही गुन्हेगारी थांबलेली नाही.
दोनमहिलांचे पैसे लंपास करणा-या तिन्ही महिला गेल्या वावडद्याकडे. आदर्शनगरातील मकरा पार्कमध्ये जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या गाडीचे चालक रामकृष्ण सूर्यवंशी राहतात. त्यांच्या आई वत्सलाबाई रमेश सूर्यवंशी (वय ५०) आणि पत्नी कामिन रामकृष्ण सूर्यवंशी (वय २७) या दोघीही गुरुवारी सोने खरेदीसाठी बाजारात जात होत्या. मोहाडी फाट्यावरून दुपारी १२.४५ वाजता त्या दोघी रिक्षा (क्र.एमएच-१९-व्ही-६०२८)मध्ये बसल्या. त्यांनी रिक्षाचालक शरद देविदास पारधी (रा.कंजरवाडा) याला अगोदरच रिक्षात कोणालाही बसवू नको, असे सांगितले होते. तरीदेखील चालकाने डी-मार्टजवळून फुले मार्केटमध्ये जाणा-या काळ्या रंगाचा शर्ट, जीन्स पँट आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या एका मुलाला रिक्षात बसवले. त्यानंतर पुढे सिंधी कॉलनी चौकातही तीन महिला रिक्षात बसल्या. त्यांच्याजवळही दोन ते अडीच वर्षांचा मुलगा होता. दुपारी वाजता त्या महिला पांडे डेअरी चौकात उतरल्या. तसेच तो मुलगाही त्याच ठिकाणी उतरला. त्यानंतर सराफ बाजारात सूर्यवंशी सासू-सून रिक्षातून खाली उतरल्या त्या वेळी त्यांना पिशवी हलकी वाटली. त्यामुळे त्यांनी पिशवी बघितली असता पर्स गायब होती. या पर्समध्ये ४३ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ त्याच रिक्षात बसून जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेऊन घटना घडलेली हद्द एमआयडीसी पोलिसांची असल्याचे सांगून पोलिसांनी या दोघींना एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाठवले. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक बी.के.कंजे यांनी चौघांसोबत तपासासाठी पोलिस पथक पाठवले.

गॅस कनेक्शन घ्यायचे होते दांपत्याला
कंडारीत मच्छीमारीचा व्यवसाय करणारे रामेश्वर प्रल्हाद भाेई (वय ३२) त्यांची पत्नी अरुणाबाई भोई हे गुरुवारी शहरात गॅसचे कनेक्शन आणि तेलाचा डबा घेण्यासाठी येत होते. दुपारी ११.२० वाजेदरम्यान ते कंडारी येथून जामनेरकडून येणा-या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसले. अरुणाबाई ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या ठिकाणी अगोदरच तीन महिला बसलेल्या होत्या. त्यापैकी एकीने लाल, दुसरीने निळी तिस-या महिलेने पोपटी रंगाची साडी नेसलेली होती. पोपटी रंगाची साडी नेसलेल्या महिलेने तोंडाला काळ्या रंगाचा स्कार्फ बांधलेला होता. तसेच एका महिलेजवळ दोन ते अडीच वर्षांचा मुलगा होता. या तिन्ही महिला दुपारी १२ वाजता अजिंठा चौफुलीजवळ उतरल्या, तर भोई दांपत्य नेरी नाका येथे उतरून तेथून चित्रा चौकात जाण्यासाठी रिक्षात बसले. चित्रा चौकात अरुणाबाई यांनी रिक्षाचालकाला पैसे देण्यासाठी पिशवीत ठेवलेली पर्स काढण्यासाठी बघितले असता पर्स गायब होती. त्या पर्समध्ये २१ हजार रुपये होते. सुदैवाने ५०० रुपये पिशवीत असल्याने ते वाचले. पर्स लंपास झाल्यामुळे घाबरलेल्या भोई दांपत्याने काही वेळातच एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले.

महिलांची मोडस ऑपरेंडी
यादोन्ही घटनांमध्ये तीन महिला असून, तिघींचा पेहराव सारखाच होता. म्हणजे, एकीने लाल, दुसरीने निळी तिस-या महिलेने पोपटी रंगाची साडी नेसलेली होती. त्यांच्याजवळ एक दोन ते अडीच वर्षांचा मुलगा होता. त्या महिलांजवळ बसून त्यांची पर्स लांबवतात.
बातम्या आणखी आहेत...