आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात डॉ.राहुल कोल्हेंकडून डॉ.शर्मा यांच्यावर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.निर्मला शर्मा यांच्यावर मंगळवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला चढविला. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेकायदा गर्भलिंग निदान करणारे डॉ. राहुल कोल्हे यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप महिला असोसिएशनने केला आहे.

गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने सोनोग्राफी सेंटरवर केलेल्या कारवाईच्या खटल्यांचे न्यायालयीन कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे दहशत निर्माण करण्यासाठीच हा हल्ला झाल्याचा संशय स्वत: डॉ. शर्मा यांनीही व्यक्त केला आहे. त्या मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयातून घरी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या घरासमोरच मोटारसायकलस्वाराने त्यांच्या कारला त्या बसलेल्या बाजूने जोरदार धडक दिली. मोटारसायकलस्वाराने त्यांना शिवीगाळदेखील केली. एव्हढेच नव्हे तर कारच्या काचेत हात घालून डॉ. शर्मा यांचा हात खेचण्याचाही प्रयत्न केला गेला. यासंदर्भात डॉ. शर्मा यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रारअर्ज दिला आहे. संशयित 7173 किंवा 7163 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवर होते.

डॉ. शर्मा यांनी दिली होती कल्पना
डॉ. शर्मा म्हणतात की, 58 वर्षात कोणासोबतही वैर नाही; पण 2009 पासून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आतापर्यंत 20 डॉक्टरांवर कारवाई करीत सोनोग्राफी मशीन सील केले आहे. पाच केसेसमध्ये स्वत: फिर्यादी आहे. यासंदर्भातील कागदोपत्री काम माझ्याकडे असून नियमानुसार कारवाई करीत असल्यामुळे माझ्यावर दबाव येत आहे. पालिका आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत मी ते नेहमीच सांगितले आहे.

निवृत्तीनंतर कोण पाठीशी राहणार
दहशत निर्माण करण्यासाठीच हा हल्ला झाला आहे. आता पालिका प्रशासन सोबत आहे. मात्र निवृत्तीनंतरदेखील मला साक्षीसाठी जावेच लागणार असल्याने तेव्हा कोण पाठीशी राहील? असा सवाल डॉ. शर्मा यांनी उपस्थित केला आहे. हल्ल्याबाबत त्या पोलिस अधीक्षकाना निवेदन देणार आहेत.

कोल्हेंचा पंचनामा; पहिले पान गायब
परळी येथून डॉ.राहुल कोल्हे यांना जळगावात आणले असता त्यांनी दोन सोनोग्राफी मशीन काढून प्रात्यक्षिक करून दाखवले होते. त्यात दोन गुन्हे दाखल करण्याची महिला असोसिएशनने वारंवार मागणी केली आहे. या गुन्ह्यातील पंचनाम्याचे पहिले पान गायब आहे. याबाबत परळी न्यायालयात युक्तिवाद झाला आहे. त्यासंदर्भात डॉ. शर्मा काम करीत असल्याने डॉ.कोल्हे यांनीच त्यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा संशय महिला असोसिएशनच्या पदाधिकारी वासंती दिघे यांनी व्यक्त केला. यापूर्वी प्रकरण दडपण्यासाठी कोल्हेंनी डॉ. शर्मा यांना प्रलोभने दिल्याचेही दिघे यांनी सांगितले.