भुसावळ- शहरात डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी मिरवणूक काढण्यात अाली. त्यात चित्ररथ पुढे नेण्याच्या विषयावरून वाद झाला. त्यात चाकूसह धारदार शस्त्राचा वापर झाल्याने तीन जण जखमी झाले. याप्रकरणी रिपाइं (अाठवले गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र खरातसह तिघांवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला.
मिरवणुकीत वरणगाव राेडवरील कमल हाॅटेलसमाेर अजय बाबुराव साेनवणे (रा. हद्दीवाल चाळ, भुसावळ) यांनी काही जणांना गुरुवारी रात्री २.३० वाजता चित्ररथ पुढे घेण्यास सांगितले. मात्र, याच गाेष्टीचा राग अाल्याने चार जणांनी निळ्या रंगाची स्काॅर्पिअाे गाडी (एमएच १९-७७७७) रस्त्यात अाडवी लावली. खाली उतरून चाकू लाेखंडी टाॅमीने अजय बाबुराव साेनवणे, विजय सुधाकर घाेडेस्वार, किशाेर हिरामण माेरे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांच्यावर जळगावात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अजय साेनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात, सागर रवींद्र खरात, अाशिष रवींद्र खरात विक्की संसारे (सर्व रा. अागवाली चाळ) या चाैघा संशयितांवर शुक्रवारी सकाळी १० वाजता खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पाेलिस ठण्याचे उपनिरीक्षक अाशिष शेळके हे तपास करीत अाहेत. बाजारपेठ शहर पाेलिस ठाण्यातील डीबी पथकाने रवींद्र खरात सागर खरात या दोघा संशयिताना अटक केली. इतरांचा शोध सुरु आहे.
खरातला स्थानबद्ध करा
रवींद्रबाबुराव खरात याच्यावर खून, बलात्कार, दराेडे, खंडणी, पाेलिसांवर हल्ला केल्याचे ३० गुन्हे दाखल अाहेत. त्याला झाेपडपट्टी दादा कायद्यांतर्गत पुन्हा स्थानबद्ध करावे, अशी मागणी पीअारपीचे जिल्हाध्यक्ष जगन साेनवणे यांनी निवेदनाद्वारे केली अाहे. तसेच रेल्वे उत्तर वाॅर्डात खरातच्या टाेळीने पालिकेच्या जागेवर २० बेकायदेशीर दुकाने बांधली असून ती ताेडावी. अन्यथा, २० एप्रिलला सकाळी पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर २०० कार्यकर्त्यांना साेबत घेऊन उपाेषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.