आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानपेटी फोडणारे दाेघे २४ तासांतच जाळ्यात, काढलेल्या फोटोंमुळे झाले जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बळीरामपेठेतील साई मंदिराच्या दोनपेटीतील अाठ हजारांची रोकड गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी लांबवली होती. यातील दोन चोरट्यांना शहर पोलिसांच्या पथकाने २४ तासांत जेरबंद केले. संशयितरित्या झोपलेल्यांचे मोबाइलवर काढलेले फोटो सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

साई मंदिराच्या खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी गुरुवारी दानपेटी फोडून अाठ हजार लंपास केले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, अमोल विसपुते, संजय शेलार, संजय भालेराव यांच्या पथकाला तपासासाठी पाठवले होते. त्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यात दोन चोरटे चोरी करताना कैद झाले होते. त्यापैकी एकाचा चेहरा थाेडा स्पष्ट दिसत होता. त्यावरून तपासाची दिशा ठरवली.

तीन दिवसांपूर्वी काढलेले फोटो आले कामात :
शहरपोलिस ठाण्याचे विजयसिंग पाटील आणि प्रितम पाटील हे दोघे कर्मचारी मे रोजी रात्री गस्त घालत होते. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांना कारंजा चौकात दोन संशयित झोपलेले दिसले. त्यांना हटकल्यावर कामासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्या दोघांचे फोटो त्यांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात काढले. मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांचे फुटेज पाहिल्यानंतर त्यातील एकाचा चेहरा फोटो काढलेल्या एका संशयिताशी मिळता जुळता होता. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी एक पथक भुसावळ रवाना केले. तर इतरांनी रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठेत चौकशी केली. त्या दोघांनी शुक्रवारी दुपारी १२ ते या वेळेत अशोक टॉकीजमध्ये चित्रपट बघितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे दोघे शहरात असल्याची खात्री झाली. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यातील तुळशीराम दिलीप चव्हाण (वय १९, रा. धरणगाव) हा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात सापडला. तर दुसरा अश्विन नितीन मोरे (वय २१, रा. आंबेडकरनगर, जुने जळगाव) हा १२.३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकात सापडला. त्यांना विचारपूस केली असता, चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच चोरीतील १८०० रुपये त्यांच्याकडून जप्त केले.

शहर पाेलिसांनी दोन्ही चोरट्यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. देवरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. अनिल बागले तर संशयितांतर्फे अॅड. अजय सिसाेदीया यांनी काम पाहिले. अश्विन माेरे हा सराईत गुन्हेगार अाहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल अाहेत.

अशी केली चोरी
गुरुवारी साई मंदिराच्या दानपेटीत मोठी रक्कम जमा होते, याची दोन्ही चोरट्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी मध्यरात्री चोरी करण्याची योजना आखली. रात्री १.३० वाजेपर्यंत ते बीजे मार्केटमध्ये लपलेले होते. त्यानंतर ते राजकमल टॉकीजच्या बाजूला असलेल्या भंगार बाजारात आले. त्यांनी भंगार बाजारातून एक लोखंडी पहार चोरली. त्यानंतर दोघे गवळीवाड्यातून साई मंदिराजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी रेल्वे येण्याची वाट बघितली. रात्री २.४५ वाजेच्या सुमारास रेल्वेच्या आवाजात खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून रक्कम लंपास केली.
बातम्या आणखी आहेत...