जळगाव- मेहरूण परिसरातून फेब्रुवारी २०१५ ला भाडे करारावर ट्रक घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला अटक केली. त्याला मंगळवारी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेेठडी सुनावली. खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या ट्रक भाडेतत्त्वावर घेऊन त्यांची भंगार बाजारात विक्री करणाऱ्यांचे माेठे रॅकेट असल्याचा संशय पाेलिसांना आहे.
मेहरूण येथील वेल्डिंग व्यावसायिक कमालोद्दिन कोलोद्दीन पिंजारी (वय ५५) यांनी दीड वर्षापूर्वी खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून ट्रक (क्र. एमएच- २४, जे- ८३८२) विकत घेतला. मात्र, ट्रक स्वत: चालवूनही फायनान्स कंपनीचे हप्ते फेडले जात नव्हते. त्यामुळे ट्रक भाड्याने देण्याचे पिंजारी यांनी निर्णय घेतला. त्या वेळी वाल्मीक ऊर्फ भगवान भिवसन चौधरी(रा. विटाभट्टी, देवपूर, धुळे) याने पिंजारी यांना ट्रकचा करार करून अधिक पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार भाडे करार ट्रक भगवान घेऊन गेला. त्यानंतर ताे अालाच नाही. या प्रकरणी एलसीबीचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळालेल्या माहितीवरून साहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबळे, सचिन बागुल यांच्यासह नुरोद्दीन शेख, शरीफोद्दीन काझी, संजय सपकाळे, सुरेश महाजन यांनी मंगळवारी भगवान चाैधरी याला धुळे येथून अटक केली.