जळगाव- मुस्लिम तरुणाशी आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग आलेल्या मद्यधुंद भावाने गर्भवती असलेल्या बहिणीच्या पोटात लाथ मारून मारहाण केली. तसेच तिच्या पतीलाही मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री समतानगरात घडली.
समतानगरात शारदा अनिस पांडे (वय २६) या विवाहितेचे माहेर अाहे. तेथे तिचे आई-वडील भाऊ नीलेश नंदलाल सुरळके ऊर्फ मिथुन भैया हा राहतो. शारदा हिने समतानगरात साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या अनिस पांडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला अाहे. ती सासरी पती अनिस, सासू मस्कुरन युनूस पांडे, सासरे युनूस कालू पांडे, दीर मोहसीन युनूस पांडे यांच्यासह एकत्र राहत आहेत. बहिणीने मुस्लिम तरुणाशी आंतरजातीय विवाह केल्याचा राग शारदाचा भाऊ नीलेश यांच्या मनात अनेक दिवसांपासून हाेता. गुरुवारी मध्यरात्री १.१५ वाजता नीलेश हा दारूच्या नशेत बहीण शारदाच्या घरी गेला. तेथे त्याने तू आंतरजातीय विवाह का केला? या कारणावरून तिला शिवीगाळ केली. तसेच त्याने घरातील टीव्ही, फ्रीजचा दरवाजा, एलसीडी मॉनिटर तसेच सायकल उचलून फेकून १५ हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर गर्भवती बहिणीच्या पोटात लाथ मारली. तसेच अनिसलाही नीलेशने मारहाण केली. याप्रकरणी शारदा हिने शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत नीलेशला अटक करण्यात आली नव्हती. नीलेशने गर्भवती शारदाच्या पाेटात लाथ मारल्याने तिला प्रचंड वेदना हाेत असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.