जळगाव - गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी रात्री 2.16 वाजता मालवाहू रिक्षाची बॅटरी चोरून नेताना तीन चोरटे मायटी ब्रदर्सच्या इमारतीवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. कॅमेर्यांच्या फुटेजची सीडी शनिवारी रात्री शहर पोलिसांकडे देण्यात आली आहे. मायटी ब्रदर्सचे संचालक मिलिंद थत्ते यांनी ‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभागी होत हे सीसीटीव्ही बसवले होते. अवघ्या एका महिन्यात सीसीटीव्हीमुळे चोरटे कॅमेर्यात कैद होण्याची थत्ते यांच्याकडील ही दुसरी घटना आहे.
शहरातील दुकानदार व व्यापार्यांनी कार्यालये, दुकानांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेत अभियान राबवले होते. त्यानुसार दाणाबाजार व सराफ बाजारातील अनेक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. सहा महिन्यांपूर्वी थत्ते यांच्या आस्थापनेबाहेर लावलेली त्यांची दुचाकी (क्र.एमएच-19/व्ही-6677) चोरीस गेली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही ती मिळून आलेली नाही. त्यामुळे भविष्यात चोरीचे प्रकार उघडकीस येण्याच्या उद्देशाने थत्ते यांनी दुकानाच्या इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
महिनाभरापूर्वी दुचाकी वाचली
गेल्या महिन्यात एका चोरट्याने रात्री 11.30 वाजता थत्ते यांच्या आस्थापनेबाहेरील त्यांच्या दुचाकीचे हॅँडल लॉक तोडले. त्यानंतर त्याने दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला. दोन मिनिटे प्रयत्न केल्यानंतर त्याला समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. कॅमेराकडे पाहिल्यानंतर चोरटा दुचाकी तशीच सोडून तिथून निघून गेला. केवळ सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्यामुळे थत्ते यांच ी एक दुचाकी चोरी होण्यापासून वाचली.
फुटेजची सीडी पोलिसांकडे
बुधवारी रात्री गोलाणी मार्केट परिसरात उभ्या असलेल्या एका रिक्षाची बॅटरी चोरीला गेली. संबंधित रिक्षाचालकाने थत्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज पाहिले. त्यात तीन चोरट्यांनी बॅटरी चोरी केल्याचे दिसून आले. या फुटेजची सीडी शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे सोपे जाणार आहे.
केवळ ‘दिव्य मराठी’मुळेच बसवले सीसीटीव्ही कॅमेरे
‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनानंतर व दुचाकीचोरीच्या घटनेमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे महत्त्व कळले होते. त्यानुसार 25 हजार रुपये खर्च करून घरासमोरून जाणार्या दोन्ही रस्त्यांवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेर्यांमध्ये आतापर्यंत चोरीच्या दोन घटना कैद झाल्या आहेत. मिलिंद थत्ते, संचालक, मायटी ब्रदर्स