आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Divya Marathi, Jalgaon, MIDC

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चाकू भोसकून युवकाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील भिलाटीत शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन गटात झालेल्या हाणामारीत एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित कैलास मोरेसह एकाला ताब्यात घेतले आहे.

अशी घडली घटना
मेहरूणमधील भिलाटीतील विजय गंगाराम पवार (वय 22) आपल्या मित्रांसह खळवाडीत वाळूवर बसला होता. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास तांबापुराकडून आलेल्या 10 ते 15 जणांच्या जमावाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला तसेच विजयच्या पोटात चाकूने वार केले. यानंतर पळत तो त्याच्या घराकडे येत असताना रस्त्यावरच पडला. परिसरातील रहिवाशांनी त्याला खासगी रुग्णालयात आणले, त्यानंतर रहिवाशांनीच पुन्हा त्याला एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी विजयला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जावयास सांगितले. त्यानंतर त्याला सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. विजयचा भाऊ सहा महिन्यापूर्वीच आजाराने मृत झालेला आहे.

पोलिस फोन उचलत नाही, हेच मोठे दुर्दैव
गेल्या एक तासापासून पोलिसांना माहिती देण्यासाठी फोन करीत आहे. मात्र, माझा फोन कोणीच उचलत नाही. दोन गटात झालेल्या वादातून एकाचा खून होतो, पोलिस वेळेवर पोहोचत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल. सुनील महाजन, उपमहापौर
क्षुल्लक कारणावरून वाद
दर शनिवारी या परिसरातील मुले क्रिकेट खेळायला जातात. त्या वेळी या दोन्ही गटांमध्ये वाद झाले होते. सायंकाळी लहान मुलगा सायकल चालवत असताना धक्का लागल्याने भिलाटीत वाद झाला. त्या वेळी शिवीगाळ केल्यानंतर दुसर्‍या गटातील 10 ते 15 तरुणांनी त्याला मारहाण केली. जमावातील एकाने विजयच्या पोटात चाकूने भोसकले.
पोलिस आले उशिरा
एमआयडीसी पोलिस ठाण्याचा एकच पोलिस कर्मचारी घटनास्थळावर हजर होता. त्यालाही काय झाले, त्याविषयी माहिती नव्हती. त्यानंतर रात्री 9.30 वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळाला भेट दिली.