आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Investigation Team Default, Divya Marathi

तपासाधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामेश्वर कॉलनीतील प्रकाश चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी उप अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तपासाधिकारी संजय चौधरी आणि नामदेव ठाकरे यांचे जबाब नोंदवले आहे. यात दोघांनीही तपासात हलगर्जीपणा केल्याचा निष्कर्ष निघाला आहे. याचा अहवाल शुक्रवारी पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांना देण्यात येणार आहे.
चौधरी यांचा 5 फेब्रुवारीला शिरसोली रस्त्यावरील सेंट टेरेसा स्कूलसमोर मिनीडोअरने धडक दिल्याने अपघात झाला होता. अनोळखी व्यक्तीने त्यांना जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले होते. तर इच्छादेवी चौकात राहणारा नाना सोनवणे याने चौधरी यांची मोटारसायकल (एमएच-19, बीएस-7127) एमआयडीसी पोलिस ठाण्यात लावून गाडीची चावी ठाणे अंमलदाराच्या समोरील टेबलावर ठेवली होती. एवढेच नव्हे तर ठाणे अंमलदाराला अपघातग्रस्त गाडी आणली असल्याचे सांगितले असल्याची साक्ष सोनवणे याने गुरुवारी बच्छाव यांच्या समोर दिली आहे. दरम्यान, गुरुवारी मृत चौधरी यांच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना चौकशी करण्याचे निवेदन दिले.
डॉक्टरांचा जबाब नोंदवून घेणार
प्रकाश चौधरी यांना सिव्हिलमध्ये दाखल कुणी केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच 6 फेब्रुवारी रोजी डॉ.उमेश नारखेडे यांनी दिलेल्या खबरीनुसार चौधरी यांचा रेल्वे अपघातामुळे मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. त्यामुळे आता डॉ. नारखेडे यांचा जबाब घेण्यात येणार आहे.
आज होणार अंत्यविधी
चौधरी यांचा बेवारस म्हणून सिव्हिलने 7 फेब्रुवारीला नेरी नाक्याजवळील स्मशानभूमी परिसरात दफन केले होते. बुधवारी त्यांची ओळख पटल्याने शुक्रवारी त्यांच्यावर कुटुंबीयांनी त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचे ठरवले आहे.
अखेर गुन्हा दाखल
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नामदेव ठाकरे स्वत: फिर्यादी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मिनीडोअर चालक व रिक्षाचालक तडवी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुरेश ढाके गुन्ह्याचा तपास करीत आहेत.