आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी करणाराच फिर्याद द्यायला येऊ का, म्हणून विचारतो तेव्हा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जुन्या ओळखीच्या आधारे एका परिचित व्यक्तीकडे मुक्कामी राहिलेल्या सराईत भामट्याने घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत दोन मित्रांच्या साथीने त्यांच्या घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. दुसर्‍या दिवशी घरमालकासोबत शाहजोगपणे या घरफोडीची फिर्याद देण्यासाठी तो पोलिस ठाण्यात येण्याची तयारी दाखवित होता. घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा त्याच्याकडे बघताच संशय बळावला आणि खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.
मनीष किशोर पाटील (रा.खोटेनगर) हा रामेश्वर कॉलनीत फिर्यादी रमेश जगराम चव्हाण यांच्या घरी वेळोवेळी परिसरात गणेशोत्सव, दुर्गोत्सवासाठी येत असायचा. त्यामुळे परिसरातील काही मुलांशी त्याचा परिचय झाला होता. मंगळवारी बर्‍हाणपूर येथील रायपूरतांडा येथे चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडे धार्मिक कार्यक्रम होता, त्या निमित्ताने कॉलनीतील युवकांसाठी त्यांनी टाटासुमो हे वाहन ठरवले होते. मनीषही या गाडीने कार्यक्रमाला गेला, कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास सगळे युवक रामेश्वर कॉलनीत परतले. रात्री खोटेनगरातील घरी जाण्यासाठी वाहन नसल्याचे निमित्त करून मनीषने शेजारी राहणार्‍या एका कुटुंबाकडून अंथरुण घेऊन चव्हाण यांच्याच घराच्या छतावर तो झोपला.
दरम्यान त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने रात्री पाळधी येथील आपले सहकारी अशोक उर्फ विक्की रामदास जाधव व रामेश्वर कॉलनीतील महेश रवींद्र खुरपडे यांना फोन करून बोलावून घेतले. तिघांनी मिळून चव्हाण यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट, लाकडी ड्रॉवर, शोकेस फोडून त्यातील साडेपाच लाख रुपये रोख, 60 हजार रुपयांचे सोन्याचे तर 40 हजार रुपयांचे चांदीचे दागिने असा साडेसहा लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. दरम्यान, बुधवारी सकाळी शेजारी राहणार्‍या चव्हाण यांच्या मोठय़ा भावाला त्यांच्या घरी चोरी झाल्याचे कळले. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. चव्हाण यांचा पुतण्या आणि साडूच्या मुलाचे लग्न मे महिन्यात होणार आहे. त्या लग्नखर्चासाठीची रक्कम चव्हाण यांच्याच घरात ठेवलेली होती. ती या भामट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उप निरीक्षक सुरेश डहाके तपास करीत आहेत.
कपाट फोडण्यासाठी घरातल्या वस्तूचाच वापर
या तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर स्वयंपाक घरातील चमचे व चिमट्याचा वापर करून लाकडी कपाट उघडले. त्यामुळे दोन चमचे वाकले आहेत. चव्हाण यांचे घर दुसर्‍या मजल्यावर असून खालच्या मजल्यावर 4/ 5 कुटुंब राहतात तर समोरील इमारतीत त्यांच्या भावासह आणखी 3/4 कुटुंब राहतात. चोरीचा प्रकार घडत असताना ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही.
पोलिसांनी केला संशय व्यक्त
घराच्या छतावर झोपलेल्या मनीषवर पोलिसांनी संशय व्यक्त केला. तपासासाठी आलेले पोलिस उप अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस निरीक्षक बी.के. कंजे आणि रत्नाकर झांबरे, रवी बिर्‍हाडे, अक्रम शेख, रामचंद्र बोरसे, अशोक संगत, बशीर तडवी यांच्या पथकाने संशयावरून मनीषला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम धडाधड सांगितला. रात्री 8 च्या सुमारास पोलिसांनी विक्की आणि महेश यांनाही ताब्यात घेतले. तिघांनी काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांच्या घरात चोरी करण्याचे नियोजन केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच फेब्रुवारी महिन्यात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्य एक घरफोडी केल्याचेही त्यांनी कबूल केले.
तिन्ही चोरट्यांनी रात्री घरफोडी केली. विक्की आणि महेश रात्रीच घरातून पसार झाले होते तर मनीष मात्र सकाळी खोटेनगरातील आपल्या घरी जाऊन फ्रेश होऊन पुन्हा रामेश्वर कॉलनीत आला. चव्हाण यांना भावाकडून घरफोडीची माहिती मिळाल्याने ते बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास जळगावात पोहचले होते. ते घरात पोलिसांना चोरी गेलेल्या वस्तूंची माहिती देत असताना मनीषही तेथेच हजर होता. तत्पूर्वी चव्हाण हे पोलिस ठाण्यात गेले तेव्हा मनीषने मदत म्हणून ‘मामा, मी पण पोलिस ठाण्यात येऊ का?’ असे विचारून त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यात येण्याची तयारी दाखवली होती.