जळगाव - गणेश कॉलनीतील युनियन बँकेचे एटीएम रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. मशीनमधील कॅश डिस्पेंसर (पैसे ठेवलेली तिजोरी) उघडण्यासाठी पासवर्ड लागतो; परंतु तो चोरट्यांना न मिळाल्यामुळे 5 लाख 74 हजार 600 रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. रात्री 12.47 वाजता एटीएममधून शेवटचे ट्रान्झेक्शन झाले आहे, तर रात्री 1.30 व 3.15 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी परिसरातून गस्त घातली आहे. गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी सुरक्षारक्षकाचा पत्ता नसल्याने चोरट्यांना फावले; पण या प्रकारामुळे बँकेची बेपर्वाई उघड झाली.
काय झाले?
सुरक्षारक्षक नसल्याने चोरीचा प्रयत्न
शहरात युनियन बँकेच्या दोन शाखा तर चार एटीएम केंद्र आहेत. यातील दोन एटीएमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी (रिर्सोसिंग) औरंगाबादच्या अॅक्टिव्ह सिक्युअर या कंपनीकडे आहे तर पुण्याच्या ब्रिक्स या कंपनीकडे सुरक्षा पुरविण्याचा मक्ता आहे. गणेश कॉलनीतील एटीएम सिंधी कॉलनीतील शाखेच्या अंतर्गत येते. या एटीएमवर सुरक्षारक्षक नसल्याची माहिती गेल्या तीन दिवसांपूर्वीच बँकेचे वरिष्ठ प्रबंधक के.एम.पाटील यांनी वरिष्ठांना दिली होती. मात्र त्यावर काहीएक हालचाल झाली नाही. अशातच रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम फोडले. याप्रकरणी प्रबंधक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसे झाले?
मुख्य केबल कापली
चोरट्यांनी चोरी करताना अत्यंत सावधगिरी बाळगली होती. एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. नंतर केंद्रात काही गैरप्रकार होत नसल्याचे भासविण्यासाठी त्यांनी कटरने लॅन कनेक्टींग केबल (बँकेच्या सर्व शाखा व एटीएमला एकमेकांशी ऑनलाइन जोडणारी वायर) कापली. त्यामुळे मशीनमध्ये बिघाड झाला किंवा एटीएम आउट ऑफ सर्व्हिस झाल्याचा संदेश इतरत्र पोहचला. यानंतर त्यांनी कॅश डिस्पेंसर (पैसे ठेवलेली तिजोरी) बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो बॉक्स काढण्यास पासवर्ड आवश्यक असते. तो पासवर्ड नसल्यामुळे चोरट्यांनी काही केबल कापल्या तरीदेखील तिजोरी बाहेर न आल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.
नुकसान
दीड लाख लागणार दुरुस्तीला
पासवर्डमुळे चोरट्यांना एटीएम फोडता न आल्याने रोकड सुरक्षित राहिली; पण एटीएमची लॅन कनेक्टींग केबलसह इतर केबल कापल्या. लॉक तोडले, सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यामुळे हे एटीएम नादुरुस्त झाले आहे. त्याला दुरुस्तीसाठी सुमारे दीड लाख खर्च येईल असे वरिष्ठ प्रबंधक पाटील यांनी सांगितले.