आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीतील आरोपी हाती लागला ‘बीस साल बाद’; करत होता एस.टी. चालक म्हणून नोकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चोरी करून फरार झालेला चोरटा तब्बल 20 वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरट्याने औरंगाबाद येथे वास्तव्य करून शासकीय नोकरीदेखील मिळवली होती. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेला हा प्रकार जळगावात उघडकीस आला आहे.

वीस वर्षे पोलिसांना हुलकावणी देणार्‍या या चोरट्याचे नाव राजेश पोपट जाधव आहे. पोलिसांनी त्याला 6 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे अटक करतेवेळी राजेश हा औरंगाबाद डेपोमध्ये एसटी चालक पदावर नोकरीवर होता. 1994 मध्ये जळगाव येथील मानराज पार्क परिसरातील राहणारे तारांचद बेन्सीमल बारवाणी यांच्या घरात 25 हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोपात राजेशसह इतर नऊ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरी करत असताना पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक खैरनार हे घटनास्थळी पोहोचले असता या ‘दशमुखां’नी त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही चोरून नेली होती. अटक केल्यानंतर राजेशवर आता खटला सुरू झाला आहे. शुक्रवारी त्याला न्यायाधीश एम.बी. दाते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. राजेशने सादर केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सरकार पक्षातर्फे अँड. प्रेरणा काळुंखे यांनी तर आरोपीतर्फे अँड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

इतर आरोपींनी भोगली शिक्षा
गुन्हा घडल्यानंतर सर्व आरोपींनी पोबारा केला होता. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन न्यायालयात हजर केले. दहापैकी फक्त राजेशच फरार झाला होता. इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला. सर्वांना एक ते चार वर्षांपर्यंत शिक्षा झाली. नऊ जणांनी शिक्षा भोगली. सध्या हे नऊ जण मोकळे आहेत. मात्र, त्या वेळी फरार झालेला राजेश आता पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

औरंगाबादेत एसटीत नोकरी
राजेशने फरार झाल्यानंतर औरंगाबाद येथे वास्तव्य केले. त्याने केवळ पोलिसांनाच गुंगारा दिला नाही तर आपल्या कौशल्यावर शासकीय नोकरीही मिळवली. तो औरंगाबाद आगारात बसचालक पदावर रुजू झाला. त्याला औरंगाबाद येथील स्थानिक तसेच जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली.