आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत दुहीमुळे भाजपचे पदाधिकारी अजून तटस्थच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिस्त व संघटनात्मक कामात सर्वात अगोदर नाव येत असलेले भाजप कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय कामकाजापासून लांब जाताना दिसत आहेत. यामागे गेल्या काही महिन्यातील पक्षांतर्गत घडामोडी व वाढत चाललेली दरी कारणीभूत असल्याचे कार्यकर्ते एकांतात सांगत आहेत. हे असेच चालत राहिले तर पालिकेतील सत्ताधार्‍यांना टक्कर देण्याची रणनीती फोल ठरू शकेल. त्यामुळेच विभागीय बैठकीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आक्रमतेच्या मुद्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान उपटले असावेत.

गेल्या काही महिन्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष अनंत जोशी व महानगरचे माजी सरचिटणीस सुनील पाटील यांनी भाजपला ‘जय र्शीराम’ करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. या पदाधिकार्‍यांसह त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते व त्यांना मानणारा गट साहजिकच पक्षापासून लांब जाणार आहे. तसेच महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर त्यात जुन्यांना पुरेसे स्थान नसल्याची ओरड कायम आहे. नवीन चेहर्‍यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर नियोजन करताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे पक्षांतर्गत मतभेदांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. सध्याच्या परिस्थितीमुळेच वाढदिवसाच्या दिवशी खुद्द विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आगामी महापालिकेची जबाबदारी सोपवलेले माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी लांब गेल्याचेही सांगितले जात आहे. यामागे आगामी कालखंडात जळगाव शहराची जागा भाजपकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका याच घडामोडींचाही संदर्भ अंतर्गत मतभेदांशी जोडला जात आहे.

खडसेंनी का खडसावले?
परवाच पार पडलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीत संघटनात्मक मजबुती व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मानसिकता यावर मार्गदर्शन केले. पूर्वी 10 कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांचा आवाज व एक हजार कार्यकर्त्यांनी आज दिलेल्या घोषणेचा आवाज यात फरक पडला आहे.आंदोलनाची नाराजी चर्चेत
पूर्वी आंदोलने स्वयंस्फूर्तीने होत होती. आज त्यासाठी आदेशाची वाट पाहावी लागते, असे आवर्जून सांगत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी गत काळात न केलेल्या आंदोलनांबाबत व्यक्त केलेली जाहीर नाराजी तर नव्हती ना? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्हा व महानगरातील कार्यकारिणी बदलल्या परंतु त्या तुलनेत कामगिरी मात्र डोळ्यात भरेल अशी दिसलेली नाही.जनतेची कामे रखडली
पदांसाठी फेर्‍या मारणारे कार्यकर्ते जनतेची कामे सोडवण्यासाठी धडपडताना दिसत नसून यामागची कारणे अनेक असू शकतात. जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढवण्यासाठी हातात हात घेऊन कामे करणे गरजेचे असताना गटातटाचे राजकारण सुरू झाल्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांना खडसावले असावे.