आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- वसुली व गळतीच्या समीकरणात फीडरनिहाय भारनियमनाचा विसर क्रॉम्प्टनला पडला आहे. वसुली व गळतीच्या समीकरणाचे गणित मिळते-जुळते ठेवण्यासाठी क्रॉम्प्टनने वीजचोरी रोखण्याबरोबरच वसुली मोहिमेला वेग दिला आहे. यासाठी शहरातील व्यापारी संकुलासह थकबाकी असलेल्या लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे क्रॉम्प्टनने नजर वळवली आहे. कंपनीच्या अधिकार्यांनी शनिवारी फुले मार्केटमधील व्यावसायिकांना लक्ष्य करीत पहिल्याच दिवशी तीन लाखांची वसुली केली.
चार जणांचे काढले मीटर
50 हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नामांकित व्यावसायिकांची यादीच विभागाने तयार केली आहे. शनिवारी फुले मार्केटमधील 20 दुकानांना भेट देऊन वसुली मोहीम राबवली. यात आठ व्यावसायिकांनी आठ दिवसांची मुदत दिली, तर चार व्यावसायिकांनी वसुलीतील काही रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत केला. तर काही रक्कम भरण्यास तयार नसलेल्या चार व्यावसायिकांचे वीजमीटरच काढण्यात आले.
एकाच मीटरवरून तीन गाळ्यांना वीजपुरवठा
व्यापारी संकुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात विजेची चोरी होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. यासह एकाच मीटरवर तीन ते चार गाळेधारक अनधिकृतपणे वीजपुरवठा घेत असल्याचेही आढळून आले आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात वीज थकबाकी वाढून विजेची गळतीही सुरू आहे. याची दखल घेत कंपनीने पोलिस बंदोबस्तात ही मोहिम सुरू ठेवली आहे. व्यापारी संकुलातील वायर्सचे जाळे काढून नवीन केबल टाकले जाणार आहे. त्यामुळे अपघाताचे धोकेही कमी होणार असून शहरातील गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, भास्कर मार्केट, बीजे मार्केटसह सर्वच व्यापारी संकुलांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याचे क्रॉम्प्टनच्या सूत्रांनी सांगितले.
पोलिस बंदोबस्तासाठी महिनाभराचा करार
वीजबिल वसुलीसाठी व चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. यासाठी पोलिस प्रशासनाशी महिन्याभराचा करार केला गेला आहे. यासाठी 70 हजार रुपयांचा खर्च क्रॉम्प्टनने उचलला आहे. आकडे काढण्यासह सुरळीत वसुली व्हावी यासाठी कंपनीने गरजेनुसार कंपनीला पोलिस यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक वाहन व पाच पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
गाळेधारकांकडे अधिक थकबाकी
थकबाकीचा रेशो सातत्याने वाढत आहे, तो कमी झाल्यास ग्राहकांना फीडरनिहाय भारनियमन करणे शक्य होणार आहे. अधिक थकबाकी ही व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे आहे, ती वसूल व्हावी यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. व्यावसायिकांनी सहकार्य केल्यास कटू कारवाई टाळता येईल. भवानीप्रसाद राव, सहायक युनिट हेड, क्रॉम्प्टन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.