आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरडाण्याजवळ पैशांचा ‘पाऊस’, नोएडात चिल्लर घेऊन जाणारा ट्रक कलंडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे | बंगळुरू येथील कोट्यवधीची चिल्लर नेणारा ट्रक धुळे-शिरपूर रस्त्यावर नरडाण्याजवळ मंगळवारी कलंडला. त्यामुळे बॅरल नाणी महामार्गावर पसरली. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत नाणे जमा करण्यासोबत वाहतूकही सुरळीत केली.
धुळे - दिल्ली जवळील नोएडा येथील टाकसाळीमध्ये कोट्यवधीची चिल्लर घेऊन जाणारा ट्रक धुळे-शिरपूर रस्त्यावरील नरडाण्याजवळ उलटला. त्यामुळे चिल्लरने गच्च भरलेले सात ड्रममधील चिल्लर महामार्गावर पसरली. या राजकोषाची लूट होण्यापूर्वीच पोलिस यंत्रणा कामाला लागली. एक-एक नाणे जमा करण्यासोबत महामार्गावरील वाहतूकही सुरळीत केली. रस्त्यावर पसरलेली ही नाणी नेण्यासाठी मुंबई येथून दुसरे वाहन मागवण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत असलेल्या बंगळुरू येथील टाकसाळीत एक दोन रुपयांच्या नाण्यांना गोल आकार देऊन कटाई करण्यात आली. यानंतर नाण्यांवर राजमुद्रा मूल्य ठसवण्यासाठी ही नाणी नोएडा येथील टाकसाळीत पाठवण्यात येत होती. धुळेमार्गे नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (एम.एच.०४/एफ.यू.६९५७) मधून या नाण्यांची वाहतूक करण्यात येत होती.मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे, सोनगीरनंतर नरडाण्याच्या दिशेने हा ट्रक निघाला होता. तापी नदीवरील उड्डाण पूल उतरताच चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे आधीच वेगात असलेल्या या वाहनाचा मागील संरक्षक दरवाजा तुटून ड्रम रस्त्यावर पडले. या ड्रममध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षित ठेवलेली चिल्लर महामार्गावर इतस्तत: पसरली. माहिती मिळताच काही जणांनी ती गोळा करण्यासाठी गर्दी केली; परंतु हाकेच्या अंतरावर असलेले नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव जाधव, उपनिरीक्षक काळे हे आपल्या पथकासह दाखल झाले.

महामार्गावर पडलेल्या भारतीय राजकोषाचा हा ऐवज त्यांनी जमा करण्यास सुरुवात केली. शिवाय अपघातात कोणीही जखमी नसल्याची खात्री करून, अपघातस्थळाजवळील वाहतूक काहीअंशी वळवली. लागलीच एक क्रेन (एम.एच.१८/झेड.६४८३) मागवण्यासोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनाही अपघाताची माहिती दिली.

दुपारी उशिरापर्यंत पोलिसांनी सर्व नाणी गोळा करून सुरक्षित ठेवली. तोवर मुंबई येथून पथक दुसरे वाहन घेऊन नरडाण्याच्या दिशेने निघाले होते. तर उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.

मुंबईच्या पथकाकडे नाणी सोपवणार
माहिती मिळताच अपघातस्थळ गाठले. कोणताही गैरप्रकार होणार नाही याकडे लक्ष दिले. संपूर्ण नाणी गोळा करण्यात आली आहेत. शिवाय या वाहनाला सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबईचे पथक आल्यानंतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून नाणी ताब्यात दिली जातील. साहेबराव जाधव, पोलिस अधिकारी.

धातू आहे अनमोल
शासनाकडूननाणे तयार करण्यासाठी अनेक धातूंचे संयुक्तीकरण करून विशिष्ट असा ठोस धातू तयार केला जातो. त्याला आकार देऊन नाणी तयार केली जातात. ही नाणीही याच धातूपासून निर्मित आहेत. धातू निर्मिती नाणे तयार करण्याच्या प्रक्रियेत शासनाचा मोठा पैसा खर्च झाला आहे.

७५१ किलो नाणी
वाहनामध्येएकूण ३१ ड्रम हे पूर्णत: नाण्यांनी भरले होते. अपघातामुळे सात ड्रम खाली पडले. चेपले गेल्यामुळे ड्रम उघडे होऊन नाणी रस्त्यावर इतस्तत: पडली. ह्या नाण्यांचे वजन सुमारे ७५१ किलो भरले. त्यांंच्यावर कोणताही ठसा नसल्यामुळे त्यांचे मूल्य मात्र निर्धारित केले जाऊ शकत नाही