आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरमध्ये संतप्त जमावाने केली १० बसेसची ताेडफाेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - जळगाव-नवापूरबसने युवकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने महामंडळाच्या आगारात बसस्थानकात जाऊन १० बसेसची तोडफोड केली. यात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बससेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडलेल्या या प्रकारामुळे शहरातही तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान बुधवारी नवापूर शहर बंद ठेवण्यात येणार अाहे.

मंगळवारी हमालीकाम करून घरी परत जाणाऱ्या सुभाष रतिलाल मावची (वय-२४) याला नवापूर आगारासमोरील गेटजवळ जळगाव-नवापूर (एम.एच -२० -बीएल -१५५२) बसने जोरदार धडक दिली. त्याच्या पोटावरून बसचे चाक गेले. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तातडीची मदत मिळाली नाही. पोलिस स्थानिक प्राध्यापक दीपक जयस्वाल यांनी त्याला तत्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथेही ‘१०८’ रुग्णवाहिकेचे डॉक्टर सोनवणे उशिरा आल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे जमाव संतप्त झाला.जमावाने नवापूर आगारात, बसस्थानकात, पोलिस ठाण्यात दगडफेक गोंधळ घातला दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी नगरसेवक आशिष मावची, नरेंद्र नगराळे, प्रा. दीपक जयस्वाल, मनू बिऱ्हाडे, राजेश गावित, हेमंत जाधव, रमेश राणा आदी सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान लाभले; अन्यथा शहरात घटनेने हिंसक वळण घेतले असते. यासंदर्भात मयत सुभाष मावची याचे मालक मनोहर चौधरी यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात जळगाव-नवापूर बसचालक गणेश नारायण पाटील (३५, रा. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त तैनात केला होता.

तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू.....
नवापूर आगारात दहा बसेसची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी बसेसची तोडफोड केली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात अाला आहे. तसेच दहा बसेसच्या कमतरतेमुळे वाहतूकव्यवस्था विस्कळीत होणार आहे. दुरुस्तीसाठी बसेस धुळ्याला रवाना करण्यात येणार आहेत.
व्ही. एस.गावित, आगार व्यवस्थापक, नवापूर

नवापूर लोकल बससेवा बंद.......
नवापूर तालुक्यातील लोकल बससेवा दुपारी एकनंतर पूर्णपणे बंद होती. बसस्थानकात फलकांची तोडफोड केली. जमावाने बस स्थानकात आल्यावर पेटवली जाईल, अशी धमकी दिल्याने दिवसभर बसस्थानकात शुकशुकाट होता. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या बसेससाठी सीनियर काॅलेज देवलफळी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळपर्यंत बससेवा ठप्प होती. यात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

पोलिसांनाही धक्काबुक्की
नवापूरआगारात दहा बसेसची तोडफोड करणाऱ्या संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही लोकांची धरपकड केल्याचा राग आल्याने जमावाने पोलिस ठाण्यात गेटजवळ सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा चालक महेश पवार यांना घेरून धक्काबुक्की केली. बसेसचे नुकसान केल्यानंतर जमाव बसस्थानकातून पसार झाला. यावेळी एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बातम्या आणखी आहेत...