जळगाव - अक्षय्य तृतीयेनिमित्त शहरातील पिंप्राळा भागात बारागाड्या ओढताना बैलगाडीचे चाक पोटावरून गेल्याने हरिविठ्ठलनगरातील एक युवक जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. राहुल झगडू भोई (वय 24) असे या युवकाचे नाव असून, तो बांधकाम कारागीर आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेहरूण भागातही बारागाड्या
मेहरूण भागातही बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 वाजता भगत मोहन वाघ यांनी पूजा करून बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली. तांबापुरापासून ते भवानीमाता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. या कार्यक्रमात भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
अपघाताची ही होती तिसरी घटना
अक्षय तृतीयेनिमित्त पिंप्राळय़ात बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. या उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होते. गुरुवारी या उत्सवादरम्यान भवानीमाता मंदिराकडून रेल्वेपुलाकडे येत असताना मंदिराजवळ एका बैलगाडीचे चाक राहुल भोई याच्या पोटावरून गेले. दुसर्या गाडीचे चाक त्याच्या अंगावरून जाण्याआधीच अन्य नागरिकांनी त्याला बाजूला ओढले. त्यामुळे तो बचावला. चाक पोटावरून गेल्यामुळे राहुलच्या पोटात जखमा झाल्या असून, त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारागाड्या ओढताना कुणीतरी जखमी होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही मागील वर्षी जुन्या जळगाव भागातील दोन युवकांना गंभीर दुखापत झाली होती. गर्दीमध्ये बारागाड्या ओढण्याचे कसब भगताकडून केले जाते. मात्र, त्यात अनेकदा अपघाताची भीतीही असते.
भवानी मंदिरापासून सुरुवात
पिंप्राळा भागातील रेल्वेपुलापासून बारागाड्या ओढण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता पोलिसपाटील निंबा पाटील यांनी विधिवत पूजा केली. तसेच भवानीमाता मंदिराचे पुरोहित नाना कुलकर्णी यांनी आरती केली. भगत हिलाल भील यांनी मंदिरास पाच प्रदक्षिणा घालून बारागाड्या ओढल्या. त्यानंतर रेल्वेपुलाजवळ माजी पोलिसपाटील विष्णू पाटील यांनी पूजन केले. ‘जय भवानी..’च्या घोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. दिनकर बारी, माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील, पुरुषोत्तम सोमाणी, जगन मिस्तरी आदींनी नियोजन केले.