जळगाव- वर्ष 2013 ला अलविदा म्हणत 2014 चे ग्रँड वेलकम करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत 31 डिसेंबरला जल्लोष करण्याची पद्धती युवकांमध्ये गेल्या काही वर्षांत रुजू लागली आहे. त्याला विरोध करणाराही मोठा वर्ग आहे. या दोघांचा मेळ घालत विदेशी सणाला भारतीय संस्कारांची जोड देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रात्रींच्या जल्लोषासाठी सज्ज होणार्या हॉटेल्सकडे जळगावकरांनी पाठ फिरवली आहे.
जैन नवयुवक मंडळ व अखिल भारतीय श्वेतांबर स्थानक जैन कॉन्फ्रेंस यांच्यातर्फे ‘संसार का सच्चा तीरथ माँ बाप’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार रूपेश वोरा व त्यांचे साथीदार कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे.
घरगुती कार्यक्रमांना पसंती
नागरिकांनी महागाई पाहता घरीच राहणे पसंत केले आहे. ग्रुप मिळून सेलिब्रेशन, आयोजनाचे प्रमाण वाढले आहे. गच्चीवर, कॉलन्यांमध्ये सामूहिकरीत्या पाटर्य़ांचे आयोजन अधिक प्रमाणात केले असल्याचे दिसून येते. तसेच घरगुती जेवणालासुद्धा प्राधान्य दिले जात आहे.
धार्मिक स्थळी जाण्याचा बेत
धुमधडाक्यात थर्टीफर्स्ट साजरा करण्याऐवजी यंदा तरूणाईसह ज्येष्ठांनी धार्मिक स्थळी जाण्याचे नियोजन केले आहे. धार्मिक स्थळामध्ये शिर्डी, शेगांवसह सप्तश्रृंगी गडाला प्राधान्य दिले आहे.
2 दोन ठिकाणी ‘डीजे’ नाइट
शहरात यंदा फक्त दोनच सार्वजनिक ठिकाणी डीजे नाइटचे आयोजन केले आहे. यात हॉटेल मैत्रेयाज येथे डीजेवर नृत्य, 50 प्रकारचे व्हेज प्रकार, कपल, मुलांसाठी गेम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. फक्त व्हेज जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच खान्देश सेंट्रल मॉल येथेदेखील डीजेचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉटेलचालकांनी फिरवली पाठ
शहरात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर नवीन वर्षाचा उत्साह हॉटेलचालकांमध्ये पाहायला मिळतो. शहरातील अनेक प्रमुख हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन तसेच जेवणाचे अनेक पदार्थांचे स्टॉल्स, जेवणाचे पॅकेज, थीम यांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा मात्र शहरात या सेलिब्रेशनचे वातावरण थंडावले आहे. दोनच ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.