आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक : सायबर सिटीझननेच राहावे सावध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्याचे माहिती तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक नागरिक हा सायबर सिटीझनच. मग तुम्हाला संगणकाचे ज्ञान नसले तरीही तुम्ही विविध माध्यमांतून सायबर जगात वावरत असतात. या जगातही गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र, यात गुन्हा करणारे अदृश्य राहात असल्यामुळे पोलिस प्रशासनालाही तपास लावण्यास अडचणी येत आहेत. यामुळे दक्ष राहण्याची गरज आहे.
सायबर गुन्हे म्हणजे काय?

संगणककिंवा मोबाइलच्या साह्याने माहितीची देवाण-घेवाण करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणता येईल. भारतातील पहिला सायबर गुन्हा जुलै २००३ मध्ये उघडकीस आला. कोलकता येथील उद्योगपती पीयूष कांकरिया यांना बेनीनमधील एका बँकेचा संचालक असल्याची बतावणी करून बेन किम नावाच्या माणसाने आणि त्याच्या टोळीतील अन्य काही जणांनी फसविले. हावडा पोलिस ठाण्यात ऑगस्ट २००३ रोजी याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
अशी काळजी घ्या

एटीएम, डेबीट कार्डवर कुठेही पिन नंबर लिहू नका, कार्ड हरवल्यास तत्काळ बँकेला कार्ड ब्लॉक करण्यास सांगा. कुठेही कार्ड स्वाइप करताना ते आपल्या समोर करून परत घ्या. त्यातील नंबर कोणीही नोंदवून घेणार नाही याकडे लक्ष द्या. बँक खाते, दूरध्वनी क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, पासवर्ड कोणालाही सांगू नका अथवा पाठवू नका. तसेच कोणाकडे एटीएम देऊन नका, अन्यथा लुट होण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक काळजी घ्या?

कोणतीहीबँक कधीही ई-मेलद्वारे कोणाचाही पासवर्ड किंवा अन्य वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे अशा ई-मेलला कधीही उत्तर देऊ नका. ई-मेलद्वारा आलेल्या संकेतस्थळांच्या लिंक्स बनावट असण्याची शक्यता असते. त्याचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणत्याही अनोळखी माणसाच्या हातात देऊ नका. कार्ड स्वाइप करायला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवा. ती व्यक्ती कार्ड नेमके कोठे स्वाइप करते आहे, याची खात्री करा. पासवर्ड कोठेही लिहून ठेवू नका. फोन, ई-मेलवर अनेक मेसेज येतात. यामध्ये काही मेसेजमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. त्यांना प्रतिसाद देण्याचे टाळावे, अशा अमिषाला बळी पडू नका.
अशी होते फसवणूक

लॉगरसॉफ्टवेअरद्वारे तुमचा पासवर्ड, बँकेचा पिन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीसी नंबर माहिती करून परस्पर पैसे काढू शकतात. तसेच मी अमूक बँकेतून बोलतोय असे सांगत काही गोपनीय माहिती विचारतात. एटीएम नूतनीकरण करावयाचे आहे म्हणून कोड मागातात. पैसे काढल्यानंतर आपल्या मोबाइलवर मेसेज येतो आणि तेव्हाच फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
असे आहेत सायबर गुन्हे

संगणक,इंटरनेट, मोबाइल यावर अश्लील दृश्ये, छोट्या क्लिप अपडेट करून त्याचा प्रसार करण्यात येतो. अंमली पदार्थ, वन्य जीवांची कातडी इंटरनेटच्या माध्यमातून विकण्याचे प्रकार केले जातात. एखाद्याचा ई-मेल हॅक करून त्यावरून संबंधित ई-मेलच्या संपर्क यादीतील लोकांना ई-मेल केले जातात. बऱ्याच वेळा अशा ई-मेलमधून पैशांचीही मागणी केली जाऊ शकते. काही वेळा ई-मेलच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची बदनामी करण्यात येते. संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरच्या साह्याने बऱ्याच वेळा बनावट नोटा, शालेय गुणपत्रके, स्टॅम्प यांची निर्मिती केली जाते. यासह इतर गुन्हे यामध्ये मोडतात.