आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइनने ‘डीएड’मधील बोगस प्रकारांना लगाम; तपासली जाणार हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अध्यापक विद्यालये ऑनलाइन करून त्यांचा संपूर्ण डाटा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे अपटुडेट होणार आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून हा जळगाव पॅटर्न राज्यातील इतर जिल्ह्यांना उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे खोटी हजेरी, प्रात्यक्षिकांचे बोगस गुणदान आणि संस्थांकडून विद्यार्थ्यांचे होणारे पिळवणुकीचे प्रकार यापुढे बंद होणार आहेत.
एनसीटीईअंतर्गत नियमांनुसार अध्यापक विद्यालये (डीएड) कार्यरत असून जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून नियंत्रण ठेवले जाते. मागील काही वर्षांपासून डीएड कॉलेजची वाढलेल्या संख्येमुळे खाजगी संस्थांकडून मनमानीनुसार शुल्काची आकारणी करून विद्यार्थ्यांची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पिळवणूक सुरू आहे. शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालये ऑनलाइन जोडले गेल्यामुळे आता बोगस प्रकारांवर डाएटचा अंकुश आला आहे. संपूर्ण माहिती ऑनलाइन सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता डीएड महाविद्यालयांचे कामकाज संपूूर्ण पेपरलेस होणार आहे.
यंत्रणेचा ताण कमी
डीएड संस्थाचालकांकडून बर्‍याच विद्यार्थ्यांची हजेरी वर्षाच्या शेवटी भरली जाते. तसेच प्रात्यक्षिकाचेही गुणदान बोगस पद्धतीने केले जाते. महाविद्यालयात उपस्थित न राहणार्‍या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन हजेरी भरली जाते. तथापी, गुणदानासाठी पिळवणूक केली जाते. तो प्रकार थांबणार आहे. तसेच वर्षाच्या शेवटी होणारी धावपळ थांबणार आहे. दर महिन्याला ठरलेले काम प्रत्येक कॉलेजला सक्तीने पूर्ण करावेच लागणार आहे.
अशी होणार प्रक्रिया
जिल्ह्यातील डीएड कॉलेज एकमेकांना जोडले असून प्रत्येक कॉलेजला कोड दिले आहे. ज्या महाविद्यालयांची माहिती तपासायची आहे, त्या महाविद्यालयाचा कोड टाकल्यास त्या महाविद्यालयाची माहिती समोर येईल. विद्यार्थ्यांची हजेरी, दिलेले गुणदान, कामाची माहितीदेखील यातून तपासता येणार आहे. यापुढे पत्रव्यवहारही ई-मेलद्वारे केले जात आहेत. डाएटकडे आलेल्या ई-मेलला दहा मिनिटाच्या आत उत्तर दिले जाते.

चार महिन्यांनंतर यश
डाएटच्या सर्व कर्मचार्‍यांमुळे ऑनलाइन यंत्रणा उभारता आली. सांगली येथे कार्यरत असताना तेथे डाएटचे काम ऑनलाइन करण्याचा स्वत: निर्णय घेतला होता. परंतु त्यावेळी जळगावला बदली झाल्यामुळे ऑनलाइनची यंत्रणा येथे पूर्ण करता आली. चार महिन्यांनंतर हा प्रयोग यशस्वी झाला असून नोव्हेंबरपासूनच संपूर्ण यंत्रणा ऑनलाइन केली आहे.
- डॉ. आय.सी. शेख, प्राचार्य, डाएट.

प्रत्येक महिन्यात फिडिंग
डी.एड. महाविद्यालयात वर्षभरात राबविण्यात येणार्‍या प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पहिल्या महिन्यातील कामकाजाची माहिती महिन्याच्या पाच तारखेच्या आत डाएटला देणे बंधनकारक राहणार आहे. यात विद्यार्थ्यांची हजेरी, अध्यापकांची हजेरी, प्रात्यक्षिकांचे गुणदान आणि राबविलेल्या उपक्रमांच्या माहितीचा डाटा महिना संपताच फीड करावे लागणार आहे.

राज्यात पहिलाच प्रयोग
जिल्ह्यातील डीएड महाविद्यालयांना ऑॅनलाइन करून त्यावर संपूर्ण नियंत्रण डाएटचे राहणार आहे. ही यंत्रणा पूर्णत्वास आली आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून डीएड कॉलेज एकमेकांना जोडले गेले आहेत. डीएड कॉलेज ऑनलाइन जोडण्याचा जळगाव जिल्हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. हा पॅटर्न प्रत्येक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेसाठी आदर्श ठरणार.