आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेली बाजार फीवसुलीच्या नावाखाली काळाबाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्सकडून मासिक फी आकारणी सुरू झाल्यापासून प्रशासनाने डेली बाजार फीवसुलीवरून लक्ष काढून घेतले आहे. दरम्यान, अजूनही शहरातील सुमारे 500 विक्रेत्यांनी नोंदणी केलेली नसून, त्यांच्याकडून डेली बाजार फीवसुलीच्या नावाखाली 10 रुपये वसूल करणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे. जमा होणारा हा पैसा पालिकेच्या तिजोरीत न जाता परस्पर गिळंकृत केला जात असून, प्रशासन याबाबत मात्र अनभिज्ञ असल्याची स्थिती आहे. रस्त्यांच्या कडेला विविध वस्तूविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून, आतापर्यंत 3 हजारांवर विक्रेत्यांनी मनपात नोंदणी केली आहे. मनपाच्या यंत्रणेकडून होणार्‍या डेली बाजार फीवसुलीतून महिन्याकाठी सुमारे 5 ते 6 लाख उत्पन्न मिळत होते. त्याऐवजी आता नोंदणी झालेल्या तीन हजार हॉकर्सकडून मासिक 300 रुपये फी एकाच वेळी वसूल करण्यात येत असून, गेल्या महिन्यात त्यापोटी 9 लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याने प्रशासन सुखावले आहे. मात्र, अजूनही सुमारे 500 विक्रेत्यांनी नोंदणी केलेली नसून, त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब हेरून या हॉकर्सकडून डेली फीवसुलीच्या नावाखाली दररोज 10 रुपये वसूल करणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे. मासिक फी भरल्याची पावती नसलेल्यांना हेरून प्रतिविक्रेता 10 रुपये वसुली करून ते पैसे मनपाच्या तिजोरीत नव्हे, तर स्वत:च्या खिशात टाकले जात आहेत.

संबंधितांची चौकशी करणार
मासिक फी आकारणी सुरू झाल्यापासून डेली बाजार फीवसुली बंद झाली आहे. पिंप्राळा आणि लक्ष्मीनगरातील बाजाराच्या दिवशीच वसुली केली जाते. याव्यतिरिक्त मनपातर्फे डेली वसुली करण्यात येत नाही. पालिकेचा कर्मचारी किंवा इतर कुणी अशा पद्धतीने परस्पर वसुली करत असल्यास कारवाई केली जाईल. प्रदीप जगताप, उपायुक्त, मनपा
या भागातून वसुलीच्या तक्रारी
शनिपेठ, गणेश कॉलनी, कोर्ट परिसर, नेहरूचौक, रिंगरोडसह मध्यवर्ती भागातून विनापावती डेली फीवसुली केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने लक्ष घातल्यास इतर भागातही सुरू असलेले वसुलीचे प्रकार उघडकीस येतील. त्रयस्थ यंत्रणेकडून या परिसरातील विक्रेत्यांकडून माहिती मागवल्यास डेली फीवसुली करणार्‍यांचा भंडाफोड होऊन पालिकेच्या महसुलावर डल्ला मारणार्‍यांची नावे समोर येणे शक्य आहे

पैसे वसुलीचा हा प्रकार गंभीर
आठवड्याचा बाजार आणि हॉकर्सकडून मासिक फी भरणा करवून घेण्यासाठी 15 कर्मचारी नियुक्त केले आहेत. डेली 10 रुपये वसूल करण्यासंदर्भात कोणालाही सांगितलेले नाही. परस्पर डेली फीवसुली होत असल्यास हा प्रकार गंभीर आहे. असे निदर्शनास आल्यास कर्मचार्‍याला पाठीशी घातले जाणार नाही. सुभाष सपकाळे, विभागप्रमुख, किरकोळ वसुली