आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळींच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी कमी होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महागाईमुळे होरपळत असलेल्या ग्राहकवर्गाला सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डाळींचे उत्पादन वाढल्याने याचा परिणाम म्हणून सर्वच डाळींच्या किंमती 8 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची चिन्हे आहेत. किंमती कमी झाल्याने ग्राहक बाजारपेठेकडे वळून आर्थिक उलाढाल वाढीची आशा व्यापारीवर्गाला आहे.

देशातील मागणीच्या तुलनेत पुरेसे उत्पादन होत नसल्याने तूर, मूग, उडीद या डाळी परदेशातून आयात करण्याची वेळ येते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरण होत असल्याने आयातीला याचा फटका बसून दरवाढीची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, यंदा देशातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्याने डाळींचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षी देशात 55 लाख टन उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा 85 टन उत्पादन झाले आहे. शासनातर्फे डाळींच्या आधारभूत किंमती 4200 रुपये प्रति क्विंटल ठरविण्यात आल्या आहेत. उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया होऊन दिवाळीअगोदर हा माल बाजारपेठेत दाखल होईल. उत्पादनवाढीमुळे डाळींच्या किंमती किमान 8 ते 10 टक्के कमी होणार आहेत. किंमती कमी झाल्याने ग्राहक खरेदीकडे आकर्षित होण्याची आशा व्यापार्‍यांना आहे.

सध्याचे दर प्रतिक्विं टलमध्ये
मूग 6700 ते 7000
उडीद 4900 ते 5200
तूर 6200 ते 6500
चणा 4100 ते 4300
मठ 5800 ते 6000

डाळींची आवक सुरू
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील चनाडाळची आवक सुरू झाली आहे. मुंबई बंदरावर ऑस्ट्रेलियन चना दाखल झाला आहे. 3250 रुपये प्रति क्विंटलमध्ये उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील नवीन चन्याचे दर 3200 ते 3250 च्या दरम्यान आहेत. मध्य प्रदेशचा चना डिसेंबर, जानेवारीपर्यंत तर राजस्थानचा चना फेब्रुवारी, मार्चपर्यंत मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

दर कमीचा फायदा
मालाच्या विक्रीवर व्यापाराचे उत्पन्न अवलंबून असते. भाव तेजीत असले की विक्री वर परिणाम होऊन पर्यायाने व्यापार्‍यांनाही याचा फटका बसतो. मालाचे दर कमी झाल्यास ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळतो आणि खरेदीही चांगली करतो.
-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन