आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे - प्रस्थापितांना खुश करण्यासाठी दलित समाजातील उच्चपदस्थ अधिका-यांनीच प्रस्थापितांपेक्षा अधिक अन्याय दलितांवर केला आहे, असा आरोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी केला.
शहरातील लॉ कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी खोब्रागडे आले होते. त्यानंतर साक्री रोडवरील सर्किट हाऊसवर त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रशासन, शासन योजना, विकास, अनुशेष आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर काही पत्रकारांशी संवाद साधला.
योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीचे काम जबाबदार अधिका-यांनाच करावे लागते.
सामाजिक बांधिलकी असेल तर अधिकारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिका-यांना निश्चितच प्रोत्साहन मिळते.
काम चांगले असेल तर राजकारणही त्याला आडवे येत नाही.
ज्या जिल्ह्यात काम करण्याला खूप संधी आहे, त्या जिल्ह्यात चांगले काम करणा-या अधिका-यांना शासनाने पाठवले पाहिजे, असे अपेक्षित आहे, असेही शेवटी उत्तमराव खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले खोब्रागडे
* हा अन्याय नाही तर काय ?
दलित समाजाचे आरक्षण घेऊन अधिकारी बनलेल्यांनी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले पाहिजे. मात्र, असे किती अधिकारी करतात, हे सांगणे आणि शोधणे अवघड आहे.
स्वत:च्या संस्था वाढवताना बनावट संस्था म्हणून बंद करण्याचा सपाटा कुणी लावला? समाजातील बड्या अधिका-यांचेच हे काम आहे.
*अन्यायग्रस्तांना अधिकारी देत नाहीत..?
सामाजिक न्याय विभागासाठी येणारा पैसा, जे ख-या अर्थाने काम करतात, त्यांना कमी आणि बनावट संस्थांना अधिक वाटला जातो, याला शासन कमी आणि अधिकारीच जास्त जबाबदार आहेत.
‘रोटी-बेटी’ बंद करा
बडे अधिकारी स्वत:चं भलं करत असतील तर समाजाचा विकास कसा होणार? त्यामुळे अशा अधिका-यांवर बहिष्कार टाकून रोटी-बेटी व्यवहार बंद करा, असा उपाय त्यांनी सुचवला.
समाजाच्या अपेक्षा
आरक्षणामुळे आयएएस, आयपीएस पदे मिळतात. त्यांना समाजासाठी काम करणे शक्य असते, पण तसे होत नाही. त्यांना समाजाशी देणं-घेणंच नसतं, असे खोब्रागडे म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.