आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळगाववर कृपादृष्टी; हतनूर, ओझरखेडा धरणावर अन्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तापीनदीवरील बहुप्रलंबित शेळगाव बॅरेजला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सध्या भुसावळ विभागात आनंददायी वातावरण आहे. दुसरीकडे मात्र हतनूरचे आठ विस्तारित वक्राकार दरवाजे आणि ओझरखेडा धरणाच्या कामाला ब्रेक लागला आहे. ओझरखेडा धरणाचे ७० टक्के काम पूर्ण होऊनही प्रकल्प रखडल्याने विशेषत: भुसावळ तालुक्याला सिंचनातून होणाऱ्या फायद्यांवर पाणी फिरले आहे.
भुसावळ तालुक्यात तापी नदीवर हतनूर आणि वाघूर नदीवर वाघूर धरण, हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मात्र, सिंचनाच्या दृष्टीने पाहता या दोन्ही प्रकल्पांपासून भुसावळ तालुक्याला कवडीचादेखील फायदा होत नाही. केवळ हतनूर धरणातून भुसावळ शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच दीपनगर, रेल्वे आणि आयुध निर्माणी कारखान्यांसाठी वार्षिक जलसाठा राखीव ठेवला जातो. यामुळे तालुक्याची सिंचनाची गरज भागवण्यासाठी शासनाने वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवर ओझरखेडा धरणाचे काम हाती घेतले. मात्र, ७० टक्के काम होऊनही हा प्रकल्प रखडला आहे. ‘हत्ती गेला अन् शेपूट अडकल,े’ अशी त्याची स्थिती आहे.

हतनूर धरणातून जून ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत होणाऱ्या विसर्गाचे पाणी उचलून ओझरखेडा धरण भरण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी हतनूर धरणाच्या पूर्वेकडील भागात जॅकवेलची उभारणीदेखील झाली असून उच्चशक्तीचे पंप, स्वतंत्र ३३ बाय ११ केव्हीचे सबस्टेशन, जॅकवेलपासून ओझरखेडा धरणापर्यंत पाइपलाइन ही कामे पूर्ण झालेली आहेत. तरीही यंदाच्या पावसाळ्यात ओझरखेडा धरणात पाणी पोहोचले नाही.

दुसरीकडे हतनूर धरणातील गाळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढून साठवण क्षमता कमी होत आहे. या गाळाचे सहज विसर्जन व्हावे, यासाठी धरणाच्या आठ विस्तारित वक्राकार दरवाजांचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, जलसंपदा विभागाने विस्तारित दरवाजांकडे दुर्लक्ष केले आहे.
भूजलपातळीखालावली : भुसावळतालुक्याचा भौगोलिक विचार करता ओझरखेडा धरण अधिक उंचीवर आहे. ओझरखेडा धरणातून सिंचन सुरू झाल्यास वरणगाव, तळवेलसह बोदवड तालुक्याची भूजलपातळी वाढेल. मात्र, यंदा पाणी उचलून सिंचन सुरू झाले असते, तर २०२१मध्ये त्याचा फायदा झाला असता.

१६ धरणे भरली असती
हतनूरमधून ओझरखेडा धरणासाठी उपसा होत नाही, तर दुसरीकडे हतनूरमधून यंदाच्या पावसाळ्यात तब्बल १६ धरणे भरतील एवढ्या पाण्याचा तापीत विसर्ग करण्यात आला. हतनूरपेक्षा कमी क्षमतेचे ओझरखेडा धरण पूर्ण झाल्यास अरबी समुद्रापर्यंत वायफळ खर्ची होत जाणाऱ्या पाण्याचा काही अंशी सदुपयोग करता येईल. गेल्या चार वर्षांत ५० हतनूर भरतील ए‌वढ्या पाण्याचा विसर्ग झाला आहे.

महानिर्मितीला सर्वाधिक फटका
दीपनगरातील महानिर्मितीचा विस्तारित आणि नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पासाठी ओझरखेडा धरणातून पाण्याची उचल होणार आहे. यासाठी महानिर्मितीने जलसंपदा विभागाला सुमारे २५० कोटी रुपये दिले आहेत. तरीही धरण रखडल्याने दीपनगर प्रकल्पाला तापीपात्रातून पाणी उचलावे लागते. तूर्त आरक्षण असल्याने अडचणी नाहीत. मात्र, भविष्यात दीपनगरची क्षमता वाढल्यावर पाण्यासाठी संच बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...