आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारासिग यांचे जळगावकरांशी अनोखे ऋणानुबंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘रुस्तम-ए-हिंद’ व अभिनेता अशी ओळख असणारे दारासिंग यांनी महाराष्ट्रातील मातीशीही घनिष्ठ नाते होते. कुस्ती किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे जळगावकरांशीही अनोखे ऋणानुबंध झाले होते. ही सर्व आठवणींची फुले ओंजळीत जपलेल्या जळगावकरांना दारासिंग यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. जिल्हा क्रीडा संघाचा कार्यक्रम असो, चोपड्यातील कुस्ती स्पर्धा असो किंवा पत्रकारांशी संवाद, सगळा पट जळगावकरांनी आज ‘दिव्य मराठी’कडे उलगडला.
एरंडोलची सभा स्मरणात
- एम. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री : 2004 मध्ये मी केंद्रीय मंत्री असताना लोकसभा निवडणुकीसाठी खासदार दारासिंग माझ्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. एरंडोल येथे आयोजित त्यांच्या सभेला युवाशक्ती मोठय़ा संख्येने एकवटली होती. या गर्दीत मी त्यांच्यापासून लांब जाऊ नये म्हणून त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. तेव्हा माझ्या पायाच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती; परंतु गर्दी भेदत दारासिंग हे सर्वांकडून स्वागत स्वीकारत चालत होते. त्यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. आम्ही दोघे दोन टर्म खासदार म्हणून संसदेत सोबत होतो. ग्रामीण भागातील असल्याने ते मला त्यांच्यासोबत प्रचाराला नेत असत. त्यांच्या निधनाने आपल्याच कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे वाटते.
क्रीडा संघाच्या आठवणी - जळगावात 25 वर्षांपूर्वी अभिनेता व रुस्तम-ए-हिंद दारासिंग जिल्हा क्रीडा संघाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनासाठी आले होते. दारासिंग आपल्या जळगावात येणार म्हणून नागरिकांत प्रचंड कुतूहल होते. पहिलवान आणि अभिनेता असे दोन्ही वलय दारासिंग यांना होते. संघाचे विश्वस्त मधुकर वारके, जे. के. महाजन, वेलजीभाई शहा, कडूतात्या पाटील, डॉ. मार्तंड वाणी यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे अनेकांना भावली होती. दारासिंग यांनी त्या वेळी एक विनोद सांगितला होता, की पहिलवानांनी एकदा लिंबू पिळण्याची शर्यत लावली होती. सर्व पहिलवानांनी लिंबू पिळले, पण एक थेंबही पडला नाही. मात्न, एकाने लिंबू पिळल्याबरोबर रस टपकला. सर्व जण त्या पहिलवानाकडे गेले व म्हणाले, तुला कसे काय शक्य झाले. तो म्हणाला, मी मी इंकम टॅक्स ऑफिसर आहे. लोकांकडून पैसे कसे काढायचे हे मला माहिती आहे. दारासिंग यांच्या या विनोदावर एकच हशा पिकला होता.
त्यांच्याकडून बरेच शिकलो - सुनील बढे, प्रदेश सरचिटणीस, भाजप : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार दारासिंग जळगावला आले. त्या वेळी हॉटेलमध्ये जात असताना त्यांना योगगुरू रामदेवबाबा यांचे शिबिर सुरू असल्याचे दिसले. त्यांनी शिबिरात जाण्याची सूचना केली व आम्ही तिकडे गेलो. दारासिंग यांना पाहताच रामदेवबाबांनी त्यांना आलिंगन देत हजारो लोकांसमोर त्यांचा सत्कार केला. ते शक्तिशाली व बुद्धिशाली तर होतेच; परंतु त्यांची विनम्रताही बरेच काही शिकवून गेली. दारासिंग खरोखर हनुमानासारखेच आदरणीय होते. त्यांच्यासोबतचा सहवास मी जिल्हाध्यक्ष असताना अनुभवला. शरीराची काळजी कशी घ्यावी, याची शिकवणही त्यांच्याकडून मिळाली.
धरणगावच्या आठवणी - अमळनेर येथील कुस्तीच्या दंगलीत भेट झाली, त्या वेळी त्यांना धरणगावातील 27 फेब्रुवारी 1994 च्या कुस्त्यांच्या दंगलीसाठी निमंत्रण दिले. ते त्यांनी सहज स्वीकारले. धिप्पाड शरीर, देखणे रूप व नम्र स्वभाव, एवढा मोठा माणूस, पण इतकी नम्रता अचंबित करणारी होती. ‘रामायण’मधील त्यांची हनुमानाची भूमिका अजरामर ठरली. त्या वेळी अनेकांनी त्यांना हनुमान समजून त्यांच्या पायावर डोके ठेवले, अशी आठवण धरणगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांनी सांगितली.
चोपड्यातील कुस्ती - चोपडा येथे 1978 मध्ये महात्मा गांधी तालुका शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात दारासिंग यांची थॉम अँग चॉंग यांच्याशी कुस्ती रंगली होती. ही कुस्ती दारासिंगच जिंकले. लोकमान्य व्यायामशाळेचे प्रशिक्षक कै. मंगलसिंग चव्हाण, कै. रतनसिंह राजपूत, शिवसेना नेते गणेश राणा यांचे वडील जगन्नाथ राणा यांनी ही कुस्ती स्पर्धा घेतली होती. या वेळी जोगिंदरसिंग व धनराज यांच्यातील कुस्ती लढतही झाली होती.
महासंघातर्फे श्रद्धांजली - जिल्हा क्रीडा महासंघातर्फे क्रीडासंकुलातील प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी दारासिंग यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, दिलीप गवळी, इकबाल मिर्झा, प्रवीण पाटील, डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, किशोर चौधरी, प्रदीप मोटवानी, उल्हास ठाकरे, अमोल चौधरी, जयंत जाधव, चेतन मालुसरे, अक्षय येवले आदी उपस्थित होते.
दारासिंग मिश्कील, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व - अतिशय मिश्कील आणि सुसंस्कृत असे दारासिंग यांचे व्यक्तिमत्त्वहोते. त्यांच्याशी संवाद साधताना ते, कुश्ती मेरा प्राण है, अशी दारासिंग यांच्याबद्दलची एक आठवण ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांनी सांगितली. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या उद्घाटनप्रसंगी 1987 मध्ये दारासिंग जळगावात आले होते. त्या वेळी ज्येष्ठ पत्रकार पानट यांनी दारासिंग यांची मुलाखत घेतली होती. प्रथम जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा मी म्हणालो ,की ‘मै दुनियां के सबसे बडे ताकदवर इन्सान से हात मिला रहा हुं’. त्यावेळेला मला ते म्हणाले, की ‘आप तो मुझसे भी ताकदवर है, आप कलम चलाते है. कलम तो तोफ से भी ज्यादा ताकदवर होती है’’ ब्रुस ली त्यांना म्हणाला होता, की मी साडेतीन सेकंदांत दारासिंग यांना चितपट करीन. याबद्दल विचारले असता ते हसत म्हणाले, ‘‘गदाधारी आणि धनुर्धारी यांच्यामध्ये कधी युद्ध होत नसते. कुस्तीबद्दल ते म्हणाले, की कुश्ती मेरा प्राण है.’’