आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजारात; उलाढाल वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - परतीच्या पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने यंदा नवरात्र दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. दसऱ्याला अनेक जण नवीन कपड्यांसह विविध प्रकारच्या वस्तू, सोने-चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मरगळ दूर झाली असून, तेजी चैतन्याचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत अधूनमधून पाऊस झाला. त्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यानंतर नवरात्रात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसाचा रब्बी हंगामाला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन िदवसांपासून बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातही नवीन घर, कपडे, सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्राॅनिक्स वस्तू खरेदीकडे अनेकांचा कल आहे. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, एसी, मिक्सर, स्वयंपाकाची आधुनिक नॉन स्टीकची भांडी, मोबाइल खरेदीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर एक वस्तू खरेदी केल्यावर त्यावर दुसरी एखादी वस्तू मोफत दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळली आहेत. त्यामुळे बाजारात उलाढाल वाढली आहे.

फूल विक्रेत्यांची तयारी
साडेतीनमुहूर्तांपैकी एक दसऱ्याला मोठे महत्त्व आहे. या दिवशी झेंडूच्या फुलांनाही मोठी मागणी असते. दसऱ्याला आता दोनच दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी आता फूल तोडणीचे नियोजन सुरू केले आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना मोठी मागणी असते. दुकानात सोनेरी रंगाची पाने विक्रीस आली आहेत.

दिवाळीपर्यंत बाजारात उलाढाल असेल कायम
^मध्यंतरी बाजारात मंदीची स्थिती होती. परतीच्या पावसामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. नागरिकांची आता खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीपर्यंत गर्दी कायम राहील, अशी आशा आहे. -संजयभगत, इलेक्ट्राॅनिक्स शो-रूम मालक

इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंवर ऑफर
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडी टीव्ही खरेदीस पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर वॉशिंग मशीन, फ्रिजचीही खरेदी होत अाहे. या सर्व वस्तूंवर हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तसेच पेन ड्राइव्ह, होम थिएटर, फ्राय पॅन मोफत दिला जात असल्याची माहिती शहरातील विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.

दिवाळीपर्यंत तेजी
नवरात्र दसऱ्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी झालेली गर्दी आता दिवाळीपर्यंत कायम असेल, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी व्यावसायिकांनी नियोजन केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांचे फलक दुकानांच्या दर्शनी भागावर लावण्यात आले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...