जळगाव- भोईटे रेल्वे गेटजवळ अप रेल्वे रुळापासून ५० मीटर अंतरावर गवतामध्ये शनिवारी रिधूर येथील दीपक आनंदा पाटील (वय २५) या तरुणाचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना आढळून आला. त्याचा डावा पाय, उजवा हात मोडलेला असून डाव्या बरगडीला धारदार वस्तू घुसल्यासारखे छिद्र पडलेले आहे. एकंदरीत सर्व संशयास्पद परिस्थितीवरून या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास भोईटे रेल्वे गेटजवळ अप रेल्वे लाइनपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या गवतामध्ये लोहमार्ग पोलिस गौतम शेंडे, अनिल नायडू यांना २५ वर्षीय टी-शर्ट जीन्स पॅन्ट परिधान केलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत युवकाचा डावा पाय, उजवा हात मोडलेला होता. पोटाच्या डाव्या बरगडीला छिद्र पडलेले होते. डोक्याला मागच्या बाजूने गंभीर इजा झालेली होती. त्याच्या हाता-पायावर जखमा होत्या. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्याबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रात्री पाऊस पडल्याने मृतदेह ताठर झालेला होता. मोडलेला हात पाय वाकलेले होते. त्याच्या खिशात पोलिसांना भ्रमणध्वनी पाकीट आढळून आले.
पाकिटात आधार-कार्ड, वाहन परवाना, ३५५ रुपये तसेच त्याच्यासह नातेवाइकांचे फोटो आढळून आले. त्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह आढळून आल्यानंतर दीपकचे काका शरद पाटील नातेवाइकांसह घटनास्थळी पाेहचले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. तेथेच पंचनामा करण्यात आला.
सायंकाळी निघाला तो परतलाच नाही : दीपकपाटील हा मूळचा जळगाव तालुक्यातील विदगावजवळील रिधूर येथील रहिवासी आहे. वर्षभरापासून तो जैन व्हॅली येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. तो रिधूर येथून जैन व्हॅली येथे ये-जा करत असे. त्याचे काका शरद महारू पाटील हे जळगावातील गणेश कॉलनीमध्ये राहतात. गेल्या सहा महिन्यांपासून तो काकांसोबत गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास हाेता. शुक्रवारी तो सकाळी जैन व्हॅलीमध्ये कामाला गेला होता. दुपारी वाजेच्या सुमारास तो कामावरून काकांच्या घरी परतला. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बाहेरून फिरून येतो, असे सांगून तो पुन्हा घराबाहेर पडला. रात्रीचे वाजले तरी तो घरी परतला नाही. कदाचित तो चित्रपट पाहण्यासाठी गेला असावा, असे कुटुंबीयांना वाटले.
परंतु, रात्री १२ वाजले तरी ताे घरी परतला नाही. त्यानंतर त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, ताे संपर्क क्षेत्राबाहेर होता. त्यानंतर सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. तर मित्रांकडेही याबाबत चौकशी केली. मात्र, त्याच्याबाबत कुणालाच माहिती नसल्याचे दीपकचे काका शरद पाटील यांनी सांगितले. दीपक शुक्रवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला, तो कुठे जाणार होता? याबाबत काहीच माहिती नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. नातेवाइकांकडे वाढदिवसाच्या पार्टीला जाणार होता, अशी जिल्हा रुग्णालयात मात्र चर्चा होती.
गवतावर फरफटल्याची चिन्हे
भोईटेनगररेल्वेगेट परिसरात जिल्हापेठ पोलिसांना शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास बेवारस स्थितीत एक विनानंबर प्लेटची दुचाकी सापडली. ती ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार तो दुचाकी घेऊन गेला होता. तिच पोलिसांना सापडलेली असावी. दीपक यांच्या पश्चात वडील आनंदा, आई सुरेखा तर सुषमा, माेना या दोन बहिणी आहेत. तो आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता.
रेल्वेतून पडल्याचा संशय
सकाळी११.१५ वाजेच्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांना भोईटे रेल्वे गेटजवळ गवतामध्ये एक मृतदेह आढळून आला. मी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी तो रेल्वेतून पडला असावा किंवा त्याला कुणी ढकलले असावे, असे वाटते. त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे. उजवा हात डावा पाय मोडलेला हाेता. गवतावर असलेल्या चिन्हांवरून तो जखमी झाल्यानंतर फरफटत गेला असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र, दीपकच्या पाकिटात किंवा खिशामध्ये पोलिसांना रेल्वेचे तिकीट आढळलेे नाही.
रेल्वे देत नाही साधा पांढरा कापड
रेल्वेरुळावर आत्महत्या किंवा अपघातातील मृतदेहांवर टाकण्यासाठी रेल्वेकडून साधा पांढरा कापडही दिला जात नाही. रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्यात येत नाही. खासगी रुग्णवाहिका बोलवावी लागते. नातेवाईकच मृतदेहावर लिंबाचा पाला टाकून मृतदेह झाकतात. कर्मचारी कमी असल्याने मृतदेह उचलण्यासाठी अडचण येते, असेही लोहमार्ग ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सी. व्ही. आहेर यांनी सांगितले.
मृत्यू कशामुळे हे सांगणे अवघड
मृताचा डावा पाय, उजवा हात मोडलेला अाहे. डाव्या बरगडीला खोलवर जखम होती. डोक्याला पाठीवर जखमा झालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. परंतु, मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे सांगता येणे अवघड आहे.
- डॉ.रेणुका भंगाळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय