आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dearness Lagnapatrika On Vats Up, Social Networking Issue At Jalgaon

व्हॉट्स अँपवर गाजतेय महागाईच्या लग्नाची पत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- महागाई आणि भ्रष्टाचाराबद्दलची चीड व्यक्त करण्यासाठी मोबाइल युर्जसंनी वेगवेगळ्या सोशल साइटचा आधार घेतला आहे. असाच एक प्रकार सध्या व्हॉट्स अँपवर चर्चेत आहे. महागाई, भ्रष्टाचारावर आधारित लग्नपत्रिका व्हॉट्स अँपवर टाकून मनोरंजनातून प्रबोधन होत आहे.


जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेच्या संगनमतानेच महागाई वाढली, हे दाखवण्यासाठी मोबाइल वापरणार्‍यांनी मात्र व्हॉट्स अँपचा आधार घेतला आहे. लग्न सराईची संधी साधून भ्रष्टाचार आणि महागाई यांच्या विवाहाचा बार व्हॉट्स अँपवरील पत्रिकेने उडवला असून महागाई वधू तर भ्रष्टाचार नवरदेव आहे.

भ्रष्टाचार हे अतृप्त राजकारणी यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून वधू कूप्रतिष्ठान क.रा.भामटे यांची सुकन्या आहे. विशेष म्हणजे दोघांनाही लोकशाहीचे आशीर्वाद असल्याचे पत्रिकेत दाखवले आहे. कॅलेंडरवर कधीही न येणार्‍या 30 फेब्रुवारीला रात्री 1.30 वाजता एचएमटी मुहूर्तावर हा विवाह निश्चित करण्यात आला आहे. विवाहवेळी उपस्थितांनी वर-वधू आणि त्यांच्या माता-पित्याच्या कानाखाली आवाज काढण्याची आणि आहेर म्हणून जोडे-चपला मारण्याची विनंती संयोजकांनी केली आहे.

हळदीऐवजी चुना
जीवनावश्यक असलेल्या हळदीचे भाव गगनाला भिडले आहे. या मुळे येणार्‍या पाहुण्या मंडळींनी वधू-वरांना हळदीऐवजी चुना लावला तरी चालेल, असा उल्लेख करून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे.

नाट्यमय ढंग
नाट्यमय ढंगाने बनवलेली ही पत्रिका तरुणांमध्ये मोबाइलवरून दुसरीकडे व्हॉट्स अँपद्वारे सहज शेअर होताना दिसते. या अजब विवाह पत्रिकेमुळे शासन आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांचे साटेलोट चव्हाट्यावर आल्याची सहज प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते.

आगमनाभिलाषी
कर बुडवे, भरा खिसे, वर बोंबले, सदा आगलावे, मारा जोडे मागा हप्ते आणि समस्त काळाबाजार परिवार, यांचा पत्रिकेतील उल्लेख आगमनाभिलाषी असा आहे. विवाहस्थळ जुगार-मटका गल्ली, भाववाढ रोड, सट्टा बाजार, भंगारवाडी-420 असा आहे. दरम्यान, ही अनोखी लग्नपत्रिका व्हॉट्स अँपवर सध्या चर्चेचा विषय असून एका मोबाइल वापरणार्‍याकडून दुसर्‍याकडे शेअर होत असल्याचे चित्र आहे.