आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Death Person Ramaining Parts Will Be Take To Cooperative Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत ठेवीदारांचा अस्थिकलश धडकणार सहकारमंत्र्यांच्या दालनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळ विभागासह जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कर्जवसुलीची स्थिती समाधानकारक असतानाही ठेवीदारांना ठेवीच्या रकमांपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने सर्व ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत देण्याचे पतसंस्थांना आदेश द्यावेत, या मागणीसाठी खान्देश ठेवीदार कृती समितीने सहकार मंत्र्यांकडे मृत ठेवीदारांचा अस्थिकलश नेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

खान्देश ठेवीदार कृती समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि फैजपूर येथील ठेवीदार उपस्थित होते. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची मोठय़ा प्रमाणात कर्ज वसुली सुरू आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम परत दिली जात नाही. सहकारमंत्र्यांच्या आश्वासनानुसार मृत, गंभीर आजारी आणि उपवर मुली असलेल्या ठेवीदारांचे अर्ज सहायक निबंधकांकडे जमा करण्यात यावे, असे आवाहन या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी केले. या बैठकीत पतसंस्थाचालकांच्या आजपर्यंतच्या संपूर्ण मालमत्ता जप्त केल्या जाव्यात, तसेच कर्ज मॅचिंगच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही समोर आली. पतसंस्थांच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी पुढील आठवड्यापासून पतसंस्थांवर मोर्चा काढण्याचे नियोजन करून प्रथम राज्यस्तरीय पतसंस्थांकडे जाण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. ठेवीदारांच्या प्रश्‍नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चुकीची माहिती दिली जात असून, त्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही या वेळी ठेवीदारांनी सांगितले. पतसंस्था चालकांकडून विविध मार्गाने कर्जदारांकडून वसुलीचे सत्र सुरूआहे. अनेक पतसंस्थांची वसुली होत असताना दुसरीकडे ठेवीदारांना मात्र ठेवी मिळत नाहीत. याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठेवीदार संघटनांतर्फे सहकारमंत्र्यांच्या दालनात मृत ठेवीदारांचा अस्थिकलश नेऊन आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात पुढील बैठकीत तारीख निश्चित करून आंदोलनाची रुपरेषा आखण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भुसावळ विभागातील ठेवीदार संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.


17 ला बैठक
पतसंस्था आणि शासनाच्या विरोधात आक्रमक आंदोलन उभारण्यासाठी खान्देश ठेवीदार कृती समितीच्या ठेवीदारांची 17 ऑगस्टला बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ही बैठक होईल. या बेठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. भुसावळ शहरासह विभागातील ठेवीदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, नथ्थू कोळी यांनी केले आहे.

दुष्काळाप्रमाणे पॅकेज
शासनाने दुष्काळग्रस्त आणि ओल्या दुष्काळासाठी निधी स्वरुपातील पॅकेज जाहीर केले आहे. याच धर्तीवर पतसंस्थांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांनाही पॅकेज द्यावे, अशी मागणी समोर आली. ठेवींच्या सर्व रकमा व्याजासह परत मिळाव्यात, यासाठी आता ठेवीदारांनी एकजूट करून आपल्या रास्त मागण्या एकत्रितपणे शासनदरबारी मांडण्याची नितांत गरज आहे. तरच शासन आणि पतसंस्थाचालक चिंताग्रस्त ठेवीदारांच्या न्याय्य मागण्यांकडे लवकर लक्ष देणार नाहीत, असेही या वेळी महिला ठेवीदार संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते यांनी सांगितले.

शासनाचे लक्ष वेधणार
पतसंस्था चालकांच्या विरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पतसंस्थांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासह सहकारमंत्र्यांकडे मृत ठेवीदारांचे अस्थिकलश नेऊन आंदोलन केले जाणार आहे. प्रवीणसिंग पाटील, अध्यक्ष, ठेवीदार कृती समिती