आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर प्रकल्पात कोळसाटंचाई; दररोज चार रॅकचा पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सध्या पुन्हा कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. हतनूर धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे पाणीसाठा पुरेसा असला तरी कोळशाचा साठा वाढवण्यासाठी दीपनगर प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात सव्वा लाख मेट्रिक टनांवर असलेला राखीव साठा आता 1 लाख 11 हजार 382 मेट्रिक टनावर पोहोचला आहे.
धरणांतील आटलेला जलसाठा आणि कोळशाची टंचाई या दोन्ही कारणांमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.
परळीचे तिन्ही वीजनिर्मिती संच बंद असल्याने दीपनगरातील चारही संच कार्यान्वित ठेवून वीजनिर्मिती करण्याचे आदेश आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी दीपनगर औष्णिक केंद्रात किमान दोन लाख मेट्रिक टन कोळशाचा साठा करण्याचे आव्हान होते. गेल्या महिन्यात के ंद्राकडे केवळ 50 हजार मेट्रिक टन कोळशाचा साठा होता. यानंतर काही प्रमाणात स्थिती सुधारून हा साठा सव्वालाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचला. मंगळवारी (दि. 1) मात्र, सहा रॅकऐवजी चार रॅक कोळशाचा पुरवठा झाला. यामुळे वीजनिर्मिती कार्यान्वित ठेवण्यासाठी शिल्लक साठ्यातून कोळसा घेण्याची वेळ आली. येत्या आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी दररोजची गरज भागवून साठा वाढवण्यासाठी वीजनिर्मिती प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. हतनूर धरणात बेमोसमी पावसामुळे जलसाठा वाढल्याने दीपनगर प्रशासनाला पाण्याची कमतरता भासणार नाही. 1 हजार क्युसेस पाण्याचे आवर्तन मिळाल्याने औष्णिक केंद्राच्या बंधा-यात 21 दिवस पाणी पुरेल इतका साठा सध्या शिल्लक आहे. 31 जुलैपर्र्यंत हतनूरमध्ये आवर्तनही कायम असल्याने पाणीटंचाईची शक्यता धुसरच आहे. दरम्यान, कोळशाचा साठा वाढल्यास वीजनिर्मितीचा टक्का पुन्हा वाढण्याची आशा आहे.

प्रकल्पातून 1,145 मेगावॅट निर्मिती
राज्यभरातील विजेची मागणी वाढल्याने दीपनगरातूनही निर्मितीचा टक्का वाढवण्यात आला आहे. केंद्रातून बुधवारी 1 हजार 145 मेगावॅट वीज मिळाली. संच क्रमांक दोनमधून 130, संच क्रमांक तीनमधून 135, चारमधून 470 तर संच क्रमांक पाचमधून 410 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. चंद्रपूरनंतर सर्वाधिक वीजनिर्मिती दीपनगर केंद्रातून करण्यात आली.

संच चारचे ओव्हरऑलिंग होणार
दीपनगर केंद्रातील संच क्रमांक चारची वार्षिक देखभाल दुरुस्ती (ओव्हरऑलिंग) करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. चंद्रपूरच्या संच क्रमांक सातचे ऑव्हरऑलिंग संपल्यानंतर दीपनगरातील संच चार बंद ठेवून ओव्हरऑलिंग होईल. यामुळे पावसाळ्यात संच क्रमांक चार महिनाभरासाठी बंद राहण्याची शक्यता आहे.

वीजनिर्मितीवर तूर्त परिणाम नाही
- दर्जेदार आणि अधिक प्रमाणात कोळसा मिळण्यासाठी मागणी नोंदवली आहे. सध्या कोळशाचा साठा वाढवण्यावर भर दिला जात असून वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात आहे. पावसाळा लांबलेला असला तरी वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु तरीही प्रशासन सजग आहे. एल. बी. चौधरी, उपमुख्य अभियंता, वीजनिर्मिती प्रकल्प, दीपनगर