आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepnagar, Bhusval, One Thousund Meggwatt Electricity

‘दीपनगर’मधून एक हजार मेगावॅट उच्चंकी वीजनिर्मिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बुधवारी प्रथमच 991 मेगावॅटची उच्चांकी वीजनिर्मिती झाली. विस्तारित व जुने अशा चारही संचांतून समाधानकारक वीजनिर्मिती झाल्याने चंद्रपूरनंतर भुसावळ (दीपनगर) केंद्राने राज्याला सर्वाधिक वीज पुरवली. दरम्यान, संच क्रमांक पाचचे कमर्शिअल ऑपरेशन डिक्लरेशन (सीओडी) 22 ते 24 मार्च दरम्यान करून मार्च अखेरपर्यंत हा संच महाजनकोकडे वर्ग होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक दोनमधून 144, संच तीनमधून 149, चारमधून 458 आणि संच पाचमधून 240 अशी एकूण 991 मेगावॅट वीजनिर्मिती झाली. दीपनगरच्या दोन्ही विस्तारित संचांना तब्बल 18 महिन्यांचा उशीर झाला आहे. सध्या मात्र कोळशाची उपलब्धता असल्याने दोन्ही विस्तारित संचांसह जुन्या संचांतून समाधानकारक वीजनिर्मिती सुरू आहे. संच चारमधून पूर्ण क्षमतेने निर्मिती होत असल्याने दीपनगरला बुधवारी आतापर्यंतच्या वीजनिर्मितीचा उच्चांक मोडता आला. 500 मेगावॅट क्षमतेवर हा संच सुरू राहिल्यास 12 एमयूएस वीजनिर्मिती होते. दीपनगर केंद्रातील संच क्रमांक चारने दोन दिवसांपूर्वी 11.5 एमयूएस वीजनिर्मिती करून 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

एमईआरसी (महाराष्ट्र वीज नियामक आयोग)च्या नियमांप्रमाणे आणि अटी शर्ती पूर्ण झाल्याने महाजनकोची मोठी जबाबदारी कमी झाली आहे.


उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. राज्याला विजेची आवश्यकता असताना दीपनगर केंद्रातून झालेल्या वीजनिर्मितीमुळे राज्याला तब्बल एक हजार मेगावॅट हक्काची वीज मिळाली. संच क्रमांक पाच यापूर्वीच 500 मेगावॅटच्या स्थापित क्षमतेवर चालविण्यात आला आहे. यामुळे 72 तासांची अंतिम सीओडी चाचणी पूर्ण करून मार्चअखेर संच भेल, टाटा कंपनीकडून महाजनकोकडे हस्तांतरित होणे शक्य आहे. प्रशासनाकडून तसे संकेत मिळाले आहेत. यामुळे संच पाचच्या किरकोळ दुरुस्तीचे काम सुरू आहे. 1 एप्रिलपासून दोन्ही विस्तारित संचांतून वीजनिर्मितीसाठी अभियंत्यांचे प्रयत्न आहेत.

प्रदूषणही वाढले- दीपनगर प्रकल्पातील चारही संच पूर्ण ताकदीने सुरू होऊन उच्चांकी वीजनिर्मिती झाली. मात्र, वीजनिर्मितीसोबतच प्रदूषणही वाढले आहे. वेल्हाळा तलावाची राखवाहिनी दोन दिवसांपासून फुटली. तरीही दुरुस्तीच्या हालचाली नाहीत. बुधवारीसुद्धा लाखो लिटर राखमिश्रित पाणी वेल्हाळे येथील तलावात सोडण्यात आले.

व्यावसायिक वीजनिर्मिती- दीपनगर येथील विस्तारित वीज निर्मिती प्रकल्पातील संच पाचची सीओडी चाचणी 22 ते 24 मार्चदरम्यान पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. सीओडी चाचणी झाल्यानंतर मार्च अखेर हा संच महाजनकोकडे येईल. 1 एप्रिलपासून दोन्ही संचांतून व्यावसायिक वीजनिर्मिती शक्य आहे.- आर. व्ही. तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर.