आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर केंद्रातील तीन संच पडले बंद; वीज निर्मितीत घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील चारपैकी तीन संच बंद पडल्याने केवळ एका संचातून 350 मेगावॉट वीज मिळत आहे. 1 हजार 420 मेगावॉट स्थापित क्षमता असलेल्या या संचांमधून महिन्याभरातील वीजनिर्मितीचा हा निच्चांक आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक दोनच्या आयडी फॅनमध्ये सलग दुसर्‍यांदा बिघाड झाला. यामुळे हा संच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दरम्यान, संच क्रमांक तीनच्या बॉयलर आणि टर्बाइन विभागात दोष निर्माण झाल्याने तो बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर हा संच मंगळवारी सायंकाळी लाइटअप करण्याचा निर्णय झाला. यामुळे बुधवारी या संचातून वीजनिर्मिती होईल. दुसरीकडे विस्तारित वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक पाचचे बॉयलर ट्यूब लिकेज झाल्याने वीजनिर्मिती ठप्प आहे. परिणामी जुन्या प्रकल्पातील संच तीन-चार आणि विस्तारित प्रकल्पातील संच क्रमांक चार-पाचमधून अपेक्षित क्षमतेने वीजनिर्मिती होत नसल्याचे चित्र आहे. केवळ संच चारमधून 350 मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. केंद्रात सध्या कोळशाची टंचाई नसली तरी निकृष्ट कोळसा मिळण्याचे प्रमाण जास्त आहे. एफ ग्रेडच्या कोळशात 20 टक्के आयात कोळसा मिसळूनही चिमणीतून राखेचे लोट बाहेर पडतात. यामुळे वीजनिर्मिती घटण्यासह परिसरातील जनतेला प्रदूषणाला सामोरे जावे लागते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सध्या कोळशाचा साठा समाधानकारक आहे. 22 हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वीजनिर्मितीमध्ये कोणताही अडथळा नको म्हणून दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात कोळशाचा जास्त क्षमतेने साठा करण्याची पद्धत प्रचलित होती. आता हा प्रकार बंद झाल्याने वीजनिर्मितीमध्ये अडचणी येऊ शकतात.


गुरुवारी संच सुरु होणार
तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलेले संच गुरुवारपर्यंत सुरु होतील. तीन आणि पाच क्रमांकाचा संच बुधवारी लाइटअप होईल. गुरुवारनंतर राज्याला दीपनगरातून उच्चंकी वीज मीळेल. आर.व्ही.तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर