आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1055 मेगावॉट वीजनिर्मिती; दीपनगर वीज प्रकल्पात आयात कोळशाचा वापर वाढला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातून बुधवारी प्रथमच उच्चांकी वीजनिर्मिती झाली. 1420 स्थापित क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्रातून बुधवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी तब्बल 1 हजार 55 मेगावॉट वीज राज्याला मिळाली. चारही संचांतून समाधानकारक वीजनिर्मितीमुळे गणेशोत्सवात निर्माण होणारी विजेची तूट काही अंशी भरून निघाली आहे.

गणेशोत्सवासाठी राज्यातील भारनियमन बंद करण्यात आले. या मुळे विजेची मागणी वाढून ती 15 हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. विजेची गरज असतानाच दीपनगर केंद्रातून निर्मितीचा पारा उंचावला आहे.

केंद्रातील चारही संचांपैकी एक किंवा दोन संचांमध्ये सातत्याने बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी चारही संच सध्या स्थापित क्षमतेच्या तुलनेत समाधानकारक वीजनिर्मिती करीत आहेत. बुधवारी संच क्रमांक दोनमधून 156, तीन 149, चार 360 आणि पाचमधून 290 अशी एकूण 1 हजार 55 मेगावॉट वीजनिर्मिती झाली. आयात कोळशाचा वापर वाढल्याने ही स्थिती सुधारली आहे.

ऑक्टोबर हिटमध्ये विजेची मागणी 16 हजार मेगावॉटपर्यंत पोहोचू शकते. यानंतरही नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीत विजेची मागणी वाढणार असल्याने दीपनगरसह राज्यातील महाजनकोच्या सर्वच औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना आयात कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे.

वीजनिर्मितीचा टक्का वाढता असल्याने गणेशोत्सवात निर्माण होणारी विजेची तूट काही प्रमाणात का असेना पण भरून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीओडीचे नियोजन
दीपनगरच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्यासाठी सदैव प्रयत्न असतात. आता तांत्रिक बिघाडांचे प्रमाण घटले आहे. आयात कोळशाचा वापर सुरू झाल्याने निर्मितीचा टप्पा वाढेल. संच क्रमांक पाचच्या सीओडीचे नियोजन सध्या सुरू आहे.
-आर. व्ही. तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर वीजनिर्मिती केंद्र