आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepnagar Electricity Project's Asha Pipe Once Again Bursting

दीपनगर वीज प्रकल्पाची राखवाहिनी पुन्हा फुटली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बंडाकडे राख वाहून नेणारी पाइपलाइन वेल्हाळे तलावावरील लोखंडी पुलावर दोन दिवसांपूर्वी फुटली. यामुळे लाखो लिटर्स राखमिर्शित पाणी तलावात मिसळणे सुरू आहे. वेल्हाळे ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी प्रदूषण थांबवण्यासाठी जलसमाधी आंदोलन करूनही दीपनगर प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून 14 किलोमिटर अंतरावरील वेल्हाळे बंडात राखचे विसर्जन केले जाते. मात्र, ऐतिहासिक वेल्हाळे तलावाजवळच राख वाहून नेणारी पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर राखमिर्शित पाणी थेट तलावात मिसळले जाते. यामुळे मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होणे शक्य आहे. दीपनगर केंद्रातील अधिकार्‍यांनी राखेचे प्रदूषण थांबवावे, यासाठी वेल्हाळे ग्रामस्थांनी 26 जानेवारीला वेल्हाळे तलावात जलसमाधी आंदोलन केले होते. विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांना खडे बोल सुनावत प्रदूषण थांबवा, अशी मागणी केली होती. यानंतर 15 दिवसांत पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर राखवाहिनी फुटून राखमिर्शित पाणी थेट रस्त्यावर आले. तरीही दीपनगर प्रशासनाने उपाययोजना केली नाही. आता दोन दिवसांपासून वेल्हाळे तलावाजवळील ओव्हरब्रिजजवळ राखवाहिनीला भगदाड पडले आहे. यासंदर्भात दीपनगर प्रशासनाला माहिती देवूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. वेल्हाळे तलावात दरवर्षी लाखो रुपयांचे मत्स्यबिज टाकले जाते. राखमिर्शित पाण्यामुळे या व्यवसायावर परिणाम होणार आहे.

वेल्डिंग वेळीच हवी
दोन दिवसांपासून राखवाहिनी फुटल्याने लाखो लिटर राखमिर्शित पाणी तलावात सोडले जाते. ठेकेदाराकडे वेल्डिंगसाठी लागणारी लांब वायरिंग नसल्याने पाइप वेल्डिंग रखडले आहे. संतोष सोनवणे, अध्यक्ष, जनता मासेमारी संस्था