भुसावळ - दीपनगर केंद्रातील क्रमांक चार आणि पाच या विस्तारित संचांतून सध्या ‘प्लँट लोड फॅक्टर’ म्हणजेच पीएलएफ ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एमईआरसीने (महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग) दिलेल्या निकषांप्रमाणे पीएलएफने उद्दिष्ट गाठले असून आगामी काळातही या संचांतून विक्रमी वीजनिर्मिती होणार आहे.
वीजनिर्मिती कमी आणि उत्पादन खर्च वाढल्याने दीपनगर केंद्रातील संच क्रमांक तीन सप्टेंबर २०१५पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. तसेच यापूर्वी संच क्रमांक दोन इकॉनॉमिकल शट-डाऊनच्या कारणामुळे बंद ठेवला होता. यामुळे आता विस्तारित दोन्ही संच अधिक क्षमतेने आणि कमी खर्चात चालवणे आवश्यक आहे. या केंद्रात मुख्य अभियंतापदी चंद्रपूर येथील उपमुख्य अभियंता अभय हरणे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी ८० टक्के पीएलएफ गाठण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही संच पूर्ण क्षमतेने चालत आहे. मध्यंतरी संच क्रमांक चार हा दोन ते तीन दिवसांसाठी बंद होता. मात्र, यानंतर या संचांतून ५०० मेगावॅट स्थापित क्षमता असताना ५०९ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली, यामुळे सरासरी गाठली गेली. आगामी काळात विस्तारित संच कोणत्याही स्थितीत सुरळीत सुरू राहावेत, संच बंद झाल्यास कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी पीएलएफ गाठण्यावर प्राधान्याने भर आहे. कमीतकमी खर्चात किफायतशीर वीजनिर्मिती या मुख्य सूत्रानुसार दीपनगर प्रकल्पातील कामकाज सुरू आहे.
काय आहे प्लँट लोड फॅक्टर ?
महाराष्ट्रराज्य वीज नियामक आयोग अर्थात एमईआरसीने दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्येक वीजनिर्मिती केंद्रातील प्रत्येक संचाच्या स्थापित क्षमतेच्या तुलनेत ८० टक्के वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. यास प्लँट लोड फॅक्टर असे म्हटले जाते. लोड फॅक्टर जर कमी असेल तर वीज उत्पादन खर्च वाढून सदरील संच तोट्यात चालतो. विदेशात पीएलएफ ९५ टक्क्यांवर असतो. देशात मात्र तो ८० टक्के असावा, असे निकष आहेत.
दीपनगर राज्यात अव्वल
विस्तारित दोन्ही प्रकल्पांतून ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्लँट लोड फॅक्टर हवा, यासाठी प्रयत्न आहेत. सर्व अभियंते, कर्मचारी आणि संघटनांची यासाठी मदत होत आहे. किफायतशीर दरात शाश्वत वीजनिर्मितीचा हा प्रयत्न फळाला आला आहे. चंद्रपूरनंतर भुसावळ केंद्र राज्यात अव्वल असेल. अभयहरणे, मुख्य अभियंता, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, दीपनगर