आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट कोळसा; दीपनगरच्या वीजनिर्मितीत 35 टक्के घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पावसाळ्यात ओल्या कोळशाचे प्रमाण वाढल्याने दीपनगरमधील वीजनिर्मितीत 35 टक्क्यांनी घट झाली आहे. 420 मेगावॉट स्थापित क्षमता असलेल्या दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या दोन्ही संचातून केवळ 270 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून बंद असलेला संच क्रमांक चार तांत्रिक दुरुस्तीनंतर चाचणीसाठी सज्ज झाला आहे. यातून शुक्रवारी 217 मेगावॉट वीजनिर्मितीचा पल्ला गाठण्यात यश आले आहे.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन्ही संच पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास राज्याला 420 मेगाव्ॉट वीज मिळते. उन्हाळ्यात या संचातून 380 मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती सुरू होती. सध्या मात्र ओल्या कोळशाचे प्रमाण वाढले आहे. ओल्या कोळशाबरोबर कोल कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात निकृष्ट कोळसा मिसळला जातो. यामुळे वीजनिर्मितीवर प्रचंड परिणाम झाला आहे. ज्या संचातून उन्हाळ्यात 380 मेगावॉटची विक्रमी वीजनिर्मिती झाली होती, त्या संचाच्या निर्मितीत आता सरासरी 35 टक्के घट झाली आहे. संच क्रमांक दोनमधून 134 तर संच क्रमांक तीनमधून 140 अशी 274 मेगावॉट वीजनिर्मिती झाली. मागील वर्षी संच क्रमांक दोनचे पावसाळ्यात कॅपीटल ओव्हरऑल करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात संच क्रमांक तीनचा ओव्हरऑल करण्यात येणार आहे. तोपर्यंत संच क्रमांक तीनमधून निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी राज्यातील विजेच्या मागणीत मात्र अजून घट झालेली नाही. ऑगस्टनंतरच विजेच्या मागणीत घट येण्याची शक्यता आहे. या वेळी संच क्रमांक तीनचे कॅपीटल ओव्हरऑल करण्यात येणार आहे.
एक्सरायडरची दुरुस्ती - दीपनगर विस्तारीत प्रकल्पातील संच क्रमांक चारचा एक्सरायडर फॅन महिन्याभरापूर्वी नादुरुस्त झाला होता. याची दुरुस्ती करण्यात आली. छत्तीसगड वीजनिर्मिती मंडळाकडून एक्सरायडर फॅन मागविण्यात आला आहे. दरम्यान, यातून आता 217 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. येत्या काही दिवसांत संच क्रमांक पाचची चाचणीदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही चाचणी पूर्ण झाली म्हणजे वीजनिर्मितीत वाढ होवून भारनियमनातून मुक्ती होण्यासाठी दिलासा मिळू शकतो. दोन्ही संच पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
रुळांचे काम अपूर्णच - दीपनगरच्या विस्तारीत प्रकल्पाला कोळसा वाहतुकीसाठी निर्माण केलेले रेल्वे रुळाचे काम अपूर्ण आहे. यामुळे कन्हेअर बेल्टच्या सहाय्याने वीजनिर्मिती केंद्रातून मिळणार्‍या कोळशावर चाचणीची धुरा टिकून आहे. संच क्रमांक पाचची चाचणी मात्र कोळशाअभावी थांबून आहे. याचबरोबर ओझरखेडा धरणाचे कामही संथगतीने सुरू असल्याने प्रत्यक्ष व्यावसायिक तत्त्वावरील वीजनिर्मिती अजून कोसो दूर आहे. कोळसा टंचाईवर मात करण्याची गरज आहे.