आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राख प्रवाहीत करण्यासाठी दररोज साडेतीन कोटी लिटर पाण्याचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मितीनंतर शिल्लक राहणारी राख वेल्हाळा बंडात पाइपलाइनच्या साहाय्याने सोडली जाते. विस्तारीत प्रकल्पातील केवळ 20 टक्के राख बंडात पाठवण्याची तरतूद असताना सध्या सेलो यंत्रातील बिघाडामुळे 100 टक्के राख बंडात वाहून नेली जाते. विशेष म्हणजे राख वाहून नेण्यासाठी दररोज 33 हजार मीटर क्युब म्हणजेच 3 कोटी 31 लाख 32 हजार लिटर पाणी वापरले जाते.

राज्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती असताना केवळ राखेच्या वहनासाठी पाण्याचा प्रचंड प्रमाणावर अपव्यय सुरू आहे. झोपेचे सोंग घेतलेली प्रशासकीय यंत्रणा गप्पच आहे.दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून दररोज निघणारी सरासरी चार हजार मेट्रिक टन राख वेल्हाळे बंडात सोडली जाते. विस्तारीत प्रकल्पातील राख ओरिएंट सिमेंट फॅक्टरी (नशिराबाद), अँडव्हाइंटर प्रोसेसिंग कंपनी (मुंबई) आणि मराठवाडा राख उद्योजक सहकारी संस्था या कंपन्यांना देण्याचा करार झाला आहे. मात्र राख वितरीत करणारे सेलो हे यंत्र नादुरुस्त असल्याने त्यातून केवळ 20 टक्के राख वितरीत होत आहे. उर्वरित 80 टक्के राख वेल्हाळा बंडावर पाइपलाइनाने वाहून नेली जात आहे. 24 तासाला राख वाहून नेण्यासाठी 33 हजार 132 मीटर क्युब अर्थात 3 कोटी 31 लाख 32 हजार लिटर पाणी वापरले जाते. दीपनगरच्या विस्तारीत प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी ओझरखेडा धरणातील पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र या धरणाचे काम रखडल्याने सध्या बेकायदेशीरपणे तापी नदीच्या पात्रातून पाण्याची उचल केली जात आहे. दुष्काळी स्थितीत तापीच्या पश्चिमेकडील भागामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होईल.

'राख वाहण्यासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाच्या उभारणीचे नियोजन आहे. यातून या पाण्याचा पुनर्वापर करता येईल. यासाठी 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दर आठ तासाला 11 हजार 44 मीटर क्युब पाण्यातून दोन हजार 886 मिटरक्यूब पाणी पुन्हा वापरता येईल. ही योजना कार्यान्वित झाल्यावर पाण्याची बचत होईल.'
-आर.व्ही. तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर केंद्र

असा होतो अनाठायी वापर
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी दररोज 12 हजार मेट्रिक टन कोळसा जाळला जातो. यातून सरासरी चार हजार मेट्रिक टन राख निघते. हॉपरमध्ये निघणारी राख उडून हवेत मिसळली जाऊ नये यासाठी फॉगर्सच्या माध्यमातून पाणी शिंपडले जाते. यासह ती वाहून नेण्यासाठीही पाण्याचा वापर होतो. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये तब्बल 11 हजार 44 मीटर क्युब पाणी राखेच्या वहनासाठी वापरले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी नवीन प्रस्तावानुसार पाण्याचा पुनर्वापर होईल. मात्र ही योजना इतर औष्णिक वीज केंद्रांत फोल ठरली आहे.

असा आहे गोलमाल
विस्तारीत प्रकल्पाला पाणी पुरवण्यासाठी ओझरखेडा धरणाची निर्मिती करण्यात आली. यात तापीतून केवळ पावसाळय़ाचे चार महिने वाहून जाणारे पुराचे पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले. प्रकल्पातील संचांची सिओडी चाचणी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना मात्र ओझरखेडा धरणाचे काम अपूर्णच राहिले. यामुळे सध्या वीजनिर्मितीसाठी दीपनगर जुन्या केंद्राने तापीत बांधलेल्या बंधार्‍यातूनच अधिक पाणी उचलले जाते. दीपनगर प्रशासन मात्र संच क्रमांक एक बंद झाल्याने त्या संचाच्या वाट्यावर आलेले पाणी आम्ही उचलत असल्याचे सांगून मोकळे होते. ऐन दुष्काळी स्थितीत पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.