आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाची राखवाहिनी पुन्हा फुटली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून वेल्हाळा बंडाकडे जाणारी राखवाहिनी फुटल्याने दोन दिवसांपूर्वी राखेचे लोट महामार्गावर पोहोचले होते. फुटलेल्या राखवाहिनीची दुरुस्ती होत नाही तोच वेल्हाळे गावाजवळ गुरुवारी पुन्हा या पाइपलाइनला भगदाड पडले आहे. यामुळे पंधरवड्यानंतर पुन्हा वेल्हाळा तलावासह शेतीशिवारांत राखेचे लोट वाहत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी आणि शेतकर्‍यांनी वारंवार तक्रारी करूनही महाजनको कंपनीने त्याची दखल घेतलेली नाही.

दीपनगर औष्णिक वीज केंद्र आणि प्रदूषणाचा उद्रेक हे सूत्रच तयार झाले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी विस्तारित प्रकल्पाची पाइपलाइन फुटून वेल्हाळा तलावात राखेचे मोठय़ा प्रमाणात उत्सर्जन झाले होते. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केल्याने महाजनको प्रशासनाला जाग आली. त्यानंतर फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी औष्णिक वीजनिर्मिती कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळच पाइपलाइन लिकेज झाल्याने राष्ट्रीय महामार्गावरदेखील राख साचली होती. दीपनगर प्रशासनाने पर्यावरणाच्या गंभीर प्रo्नाकडे दुर्लक्ष केल्याने राखवाहिनी फुटण्याच्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. महामार्गावरील राखेचे उत्सर्जन बंद होत नाही, तोच आता पुन्हा वेल्हाळा गावाजवळ पाइपलाइनला मोठे भगदाड पडले. दररोज हजारो मेट्रीक टन राख यातून बाहेर पडत आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेल्हाळा तलावात राखेचे उत्सर्जन होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. भविष्यात यामुळे मत्स्यपालन व्यवसायावर संकट येणार असल्याने किमान 90 कुटुंबीयांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळेल. पाइपलाइन फुटलेल्या भागातून राखमिर्शित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये जाते.

नाल्यांचा नैसर्गिक स्त्रोत वेल्हाळा तलावाकडे जात असल्याने या नाल्यांवर फिल्टर बंधारे बांधण्याचे आश्वासन महाजनको कंपनीने दिले होते. दुर्दैवाने या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. राख वाहतुकीसाठी आता वनविभागाच्या मालकीच्या जागांचा वापर होत आहे. यामुळे झाडांची कत्तल केली जात आहे. गुरांसाठीचे कुरणही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राख वाहतुकीतून मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याने दीपनगर प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.