आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनकोला 108 कोटींचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर विस्तारित प्रकल्पातील संच पाचच्या हॉपर दुर्घटनेला आता महिना होईल. हा संच सुरू असता तर दररोज 1 कोटी 20 लाखप्रमाणे महिनाभरात 36 कोटी युनिट वीजनिर्मिती झाली असती. तीन रुपये युनिटप्रमाणे या विजेचे मूल्य 108 कोटी रुपये होते. मात्र, संच बंद असल्याने महाजनकोला हे नुकसान सोसावे लागत आहे. भेल आणि सहयोगी कंपन्यांच्या दुर्लक्षाने हॉपर दुर्घटनेत दोघांचा बळी गेला. आता आर्थिक फटका बसत आहे.

दीपनगर विस्तारित प्रकल्पातील 500 मेगाव्ॉट स्थापित क्षमतेच्या संच क्रमांक पाचमध्ये 17 ऑक्टोबरला हॉपर कोसळून दोन मजूर ठार झाले. सीओडीची तयारी सुरू असतानाच संचामध्ये हॉपर दुर्घटना झाल्याने व्यावसायिक वीजनिर्मिती सहा महिने लांबली आहे. सध्या या संच पाचमधून वीजनिर्मिती पूर्णपणे बंद आहे. किती महिने वीजनिर्मिती होणार नाही? याचा नेमका कालावधी अजूनही स्पष्ट झालेला नाही. दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या संचातून वीजनिर्मिती बंद असल्याने महाजनकोला मात्र कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

प्रश्न सुटेल काय?
दीपनगर येथील वीज प्रकल्पातील हॉपर दुर्घटनेचे खापर उपमुख्य अभियंता आर.व्ही. तासकर आणि राख हाताळणी विभागातील उप कार्यकारी अभियंता पी.आर.टेकाडे यांच्यावर फुटले. या दोघांना निलंबित करण्यात आले. मात्र, यानंतरही अनेक प्रश्न जैसे थे आहेत. निलंबनाने महाजनकोचे आर्थिक नुकसान भरून निघणार नाही. संपूर्ण प्रकल्पाची तपासणी करून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित व्हावी.

अनेक तक्रारी दुर्लक्षित
दीपनगरातील तब्बल 8 हजार 400 कोटी रुपयांचा विस्तारित प्रकल्प अत्यंत निकृष्ट आहे. या मुळे कामगारांचा जीव धोक्यात आहे. यासंदर्भात महाजनको, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर कारवाई गरजेची आहे. राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद

पर्यावरणाला फटका
प्रकल्प अहवालानुसार राखेचे वाटप एएचपी विभागातच करणे आवश्यक आहे. मात्र, तरीही बॉटम अँश पाइपलाइनमधून सोडली जाते. पर्यायाने निकृष्ट कामाचा फटका पर्यावरण आणि महाजनकोला बसतो. सुरेंद्र चौधरी, सचिव, उपज संस्था, भुसावळ

प्रकल्पाचे नुकसान जास्त
500 मेगावॉट क्षमतेच्या संचातून 24 तासांत 1 कोटी 20 लाख किलोव्ॉट अर्थात युनिट वीजनिर्मिती होते. 3 रुपये युनिटचा दर गृहित धरल्यास दिवसभरात निर्माण होणार्‍या विजेचे मूल्य 3 कोटी 60 लाख रुपये होते. महिन्याला हा आकडा 180 कोटी रुपयांपर्यंत जातो. या मुळे जेवढे दिवस संच बंद, तेवढे नुकसानीचे प्रमाण जास्त राहू शकते.

ढिगारा उपसणे सुरूच
दीपनगर वीज प्रकल्पातील हॉपर दुर्घटनेला आता महिनाभराचा कालावधी पूर्ण होईल. तरीही केवळ ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. कामाची ही गती पाहता अजून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने तरी संच पाचमधून वीजनिर्मिती होण्यासाठी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुळे महाजनको प्रशासनाला किमान 600 क ोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.