आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर औष्णिक वीज केंद्र: ‘स्पॉट व्हिजिट’ नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - प्रदूषणविषयक तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी, दीपनगर औष्णिक वीज केंद्र प्रशासनाला 1973 चे कलम 136 नुसार भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस द्यावी, असे आदेश तत्कालीन प्रांत राहुल मुंडके यांना दिले होते. याप्रकरणी सध्या सुनावणी सुरू असली तरी पुढील कार्यवाहीसाठी प्रांताधिकार्‍यांची स्पॉट व्हिजिट होणे गरजेचे आहे.

दीपनगर केंद्राच्या चिमणीतून निघणारी राख, वेल्हाळे बंडाकडे जाणारी राखवाहिनी फुटून वारंवार होणार्‍या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन प्रांताधिकारी राहुल मुंडके यांना 14 फेब्रुवारी 2013 रोजी पत्र दिले. राखेच्या प्रदूषणाबाबत 13 विषयांवरील उपाययोजनांच्या कृती आराखड्यासह प्रगती अहवाल सादर करण्याची सूचना पत्रातून केली होती. तसेच 1973 चे कलम 133 अन्वये सुनावणीची संधी दिली होती. यानुषंगाने 21 फेब्रुवारीला आदेश देऊन दीपनगरच्या अधिकार्‍यांना 12 मार्च 2013 रोजी उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

आदेशाचे उल्लंघन झाल्यास 1973 चे कलम 136 नुसार भारतीय दंड संहिता (1860 चा 45) कलम 188 खाली फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा स्पष्ट उल्लेख होता. या प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून केवळ तारीख पे तारीख सुरू असून पुढील कार्यवाही स्पॉट व्हिजिट केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तत्कालीन प्रांत मुंडके यांची बदली झाल्यानंतर भांगरे यांनी पदभार स्वीकारला. या मुळे त्यांची स्पॉट व्हिजिट महत्त्वाची ठरेल.

असा होतो उद्रेक, आरोग्य बिघडले
राखेच्या प्रदूषणामुळे दीपनगर परिसरातील नागरिकांना फुफ्फुसाचे आजार, दम्याचे विकार, डोळ्यांची जळजळ, किडनी स्टोन आदी विकार जडले आहेत. पाइपलाइन फुटून आणि चिमणीतून निघणार्‍या राखेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात वाढले असून शेतीशिवाराचे प्रचंड नुकसान होऊन शेतकर्‍यांचे सरासरी 50 टक्के उत्पन्न कमी झाले. वेल्हाळे, फेकरी आणि पिंप्रीसेकम या गावांमध्ये तर प्रदूषणाने कहरच केला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होते.

ग्रामस्थांचा रोष अजूनही कायम
दीपनगर वीज केंद्र, प्रांत कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणाचा प्रo्न सुटत नाही, असा ग्रामस्थांचा रोष आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ वेळोवेळी दीपनगरच्या अधिकार्‍यांवर कारवाई करीत नाही. या मुळे वेल्हाळे तलावातील राख काढणे व इतर कामांना ब्रेक लागल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारी आहेत.

लेखी आश्वासने
ऐतिहासिक वेल्हाळे तलावातील राखेचे प्रदूषण थांबवणे व अन्य मागण्यांसाठी वेल्हाळे ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2012 रोजी अँश बंडामध्ये जलसमाधी आंदोलन केले होते. या वेळी तत्कालीन मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांनी आंदोलनाच्या पाच महत्त्वाच्या मागण्यांवर कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अजूनही अंमलबजावणी नाही.

‘एसपी’चा दबाव?
दीपनगर ते वेल्हाळे बंड या 14 किलोमीटरच्या राखवाहिनीचे मेंटनन्स करण्याचा ठेका ‘एसपी एंटरप्राइजेस’ने घेतला आहे. याच कंत्राटदाराने दीपनगरात कोसळलेल्या हॉपरचे काही काम केले होते. मात्र, पुढार्‍यांचा वरदहस्त असल्याने राखवाहिनी फुटून नुकसान झाले तरी अधिकारी कारवाईसाठी धजावत नाही.

मुद्यांच्या आधारे होईल कारवाई
दीपनगरच्या प्रदूषणासंबंधी तक्रारदारांनी विनंती केल्यामुळे पाहणीची तारीख पुढे ढकलली आहे. चौकशीचा भाग म्हणून दीपनगरला लवकरच स्पॉट व्हिजिट होईल. सर्व खाते प्रमुखांकडून माहिती घेतल्यानंतर समोर येतील त्या मुद्यांच्या आधारे पुढील कारवाई करू. यासंदर्भातील कार्यवाही करताना आमच्याकडून कोणताही विलंब झाला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, कोणताही कसूर होणार नाही. विजयकुमार भांगरे, प्रांताधिकारी, भुसावळ विभाग