आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरमध्ये झाली कागदोपत्री आठ हजार वृक्ष लागवड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर विस्तारीत औष्णिक वीज निर्मिती केंद्राने सन 2007 पासून आजतागायत 8 हजार 95 वृक्ष लागवड केल्याचा दावा केला आहे. विस्तारीत केंद्र आणि परिसरात प्रत्यक्षात मात्र 800 वृक्ष सुद्धा नाहीत. यामुळे विस्तारीत वीज केंद्राचा कागदोपत्री वृक्ष लागवडीचा नमुना चव्हाट्यावर आला आहे.
दीपनगर विस्तारीत वीज निर्मिती प्रकल्पाच्या कामकाजाला 2007 पासून सुरुवात झाली. 62 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. यासाठी 50 झाडांची कत्तल करण्यात आली. यासाठी प्रकल्पाने मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिका-यांकडून परवानगी देखील घेतली. मात्र, प्रत्यक्षात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली. प्रकल्पाची सुरुवात ते 2011 पर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी 8 हजार 95 वृक्ष लागवड केल्याची नोंद आहे. त्यात प्रकल्प कार्यालय परिसरात 1985, चेमरी विश्रामगृहाजवळ 107, ए टाइप क्वॉर्टर येथे 213, पिंप्रीसेकम रस्त्यावर 800 तर 1800 झाडे ग्रामपंचायतींना देण्यात आली आहेत. यासाठी 57 लाख 401 रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींना दिलेली रोपे जगली आहेत की नाही? याचे उत्तर प्रकल्पाकडे नाही. प्रकल्प परिसरातही हिच स्थिती आहे. हजारावर रोपांची लागवड केलेली असली तरी वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे. शासनाची दिशाभूल करून पर्यावरणासोबतचा खेळ अजूनही कायम आहे.
वृक्षांवर हवेत क्रमांक - वृक्षारोपण केल्यानंतर प्रत्येक झाडावर क्रमांकाचे स्टिकर लावणे नियमाने बंधनकारक आहे. मात्र, दीपनगर प्रकल्पात लागवड केलेल्या कोणत्याही वृक्षांवर क्रमांक टाकण्यात आलेले नाही. जुन्या प्रकल्पातही 47 हजार वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात येतो. यातीत सत्यता चौकशीतून तपासणे गरजेचे झाले आहे.
जलवाहिनीसाठी 20 वृक्ष तोडले - प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून वेल्हाळा अ‍ॅश बंडपर्यंतच्या जलवाहिनीसाठी निंबाची 13, बाबुळीची तीन, आडजातीचे चार असे केवळ 20 झाडे तोडण्याची परवानगी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी 15 जुलै 2010 रोजी दिली होती. प्रत्यक्षात मात्र येथे शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली. तोडणी परवानगी मागितलेल्या झाडांच्या संख्येइतकी झाडे पावसाळ््यात लावणे आणि जगविणे बंधनकारक असेल, अशी अटही टाकण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही.