आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी ट्रँझॅक्शन चार्जेस घटवावेत, कॅशलेस व्यवहारासाठी व्यापाऱ्यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - होलसेल व्यापाऱ्यांना एक ते दीड टक्के नफा मिळतो. मात्र, स्वॅप मशीनचा वापर करताना १.५ टक्के ट्रँझॅक्शन चार्ज लावण्यात येतो, तो व्यापाऱ्यांना परवडत नाही. हे चार्जेस कमी करण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी मंगळवारी केली. तसेच स्वॅप मशीन घेतल्यानंतर ग्रामीण भागातील ग्राहक रोख रक्कम घेऊन खरेदीसाठी येतात, त्यांच्याशीही व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बँकांनी अधिकाधिक ग्राहकांना डेबिट क्रेडिट कार्ड वितरित करावेत, अशा सूचना करून कॅशलेस व्यवहारांसाठी पीओएस मशीन वापरण्यास सर्व व्यापाऱ्यांनी सहमतीही दर्शवली आहे.
गोलाणी मार्केटमध्ये जिल्हा व्यापारी महामंडळाच्या सभागृहात गोलाणी व्यापार संकुलातील व्यापाऱ्यांसाठी कॅशलेस आर्थिक देवाणघेवाण संदर्भात मंगळवारी शिबिर झाले. यात कॅशलेस व्यवहारांबाबत व्यापारी, बँक अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातर्फे माहितीचे अदान-प्रदान आणि विचारविनिमय करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन लढ्ढा हे होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दामले, स्टेट बँकेचे सहायक महाप्रबंधक अशोक गुप्ता, व्यापारी महामंडळाचे विजय काबरा, सुभाष कासट, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी कॅशलेससाठी पुढाकार घ्यावा : कॅशलेसव्यवहार हे व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर पारदर्शक आहेत. लक्षावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापारी, दुकानदार हे माध्यम आहेत. ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी ‘कॅशलेस’ साठी पुढाकार घेतला तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचेल. व्यापारी बांधवांनी कॅशलेससाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले. व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्या दुकानावर होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही सुविधा अत्यंत सोपी, फायदेशीर स्वस्त आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी ही यंत्रणा आपल्या दुकानात कार्यान्वित करावी. स्वॅप मशीनवरील ट्रान्झॅक्शनवर लागणारे चार्जेस कमी करण्यासाठी प्रशासनाला कळवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रशिक्षण
जिल्हाधिकारीकार्यालयातर्फेही कॅशलेस आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात अल्पबचत सभागृहात मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र संचालक, आपले सरकार सेवा केंद्रचालक आदींना सकाळच्या सत्रात तर दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात विविध उपकरणांची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते
बातम्या आणखी आहेत...