आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात डेंग्यूच्या नऊ रुग्णांवर उपचार सुरू; न्यूमोनिया, काविळची साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात सध्या डेंग्यू, मलेरिया, न्यूमोनिया, टायफाइड आणि काविळ या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या आजारांनी ग्रस्त असलेल्या जवळपास 60 रुग्णांवर शहरात उपचार सुरू आहेत. तसेच शहरातील डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. त्यात ग्रामीण भागातील सहा रुग्णांचाही समावेश आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. खासगी दवाखान्यांची दररोजची ओपीडी 40 टक्कय़ांनी वाढल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे.


प्रचंड अस्वच्छता आणि गेल्या पंधरवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे रुग्णसंख्येत भर पडली. पावसामुळे वातावरणातील आद्र्रता 90 टक्क्यांपेक्षा अधिक होती, तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत होते. या मुळे रोगट वातावरणाची निर्मिती झाली. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या डेंग्यूच्या नऊ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिका रुग्णालयातून मिळाली. शनिवारी डॉ.दीपक जावळे यांच्या रुग्णालयात डेंग्यूसदृश आजाराचा एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. डेंग्यू रुग्णांच्या प्लेटलेट्स (रक्तबिंबीका) झपाट्याने कमी होत असल्याचे प्रमुख लक्षण असून ते जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डेंग्यूसोबत मलेरिया, टायफाइड, न्यूमोनिया आणि काविळ या आजारांचाही उद्रेक वाढला आहे. यातील टायफाइड आजार जिवाणूंमुळे तर न्यूमोनिया आणि काविळ हे आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे वाढत असल्याचे, डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या प्रत्येक खासगी रुग्णालयात तब्बल 40 टक्के ओपीडी वाढली आहे. तापमानात वाढ होत असल्याने रोगांचा फैलाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरडा दिवस पाळा
साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. या मुळे आठवड्यातून एक ‘कोरडा दिवस’ पाळणे आवश्यक आहे. घराबाहेर निघताना पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे वापरावेत. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. घराभोवती स्वच्छता ठेवावी.
-डॉ. पंकज राणे, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ

वरणगावचा एक रुग्ण
प्रदीप चौधरी (वय 45, रा.वरणगाव) यांना डेंग्यू सदृश लक्षण जाणवल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील डॉ. दीपक जावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रक्त तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

असा होतो फैलाव
डेंग्यूग्रस्त व्यक्तीच्या रक्तातील विषाणू ‘एडिस इजिप्ती’डासाच्या मादीमार्फत निरोगी व्यक्तीकडे संक्रमित होतात. मादीच्या चाव्यामुळे हे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात दाखल होतात.

डेंग्यूची लक्षणे अशी
0 तीव्र स्वरुपाचा ताप, डोक्याचा पुढील भाग दुखणे
0 शरीरातील स्नायू, हाडांमध्ये प्रचंड वेदना
0 जीभेची चव, भूक हळूहळू नष्ट होते
0 शरीरावर गोवरासारखे पुरळ येतात
0 मळमळ, उलट्या, प्लेटलेट्सची संख्या घटणे

हे उपाय आवश्यक
0 घरातील सर्व पाणी उपसून कोरडा दिवस पाळणे
0 रस्त्यांवरील खड्डे, टायर, कुलरमध्ये पाणी साचू न देणे
0 डास प्रतिबंधक साधनांचा वापर
0 पूर्ण अंग झाकले जाईल अशा कपड्यांचा वापर