आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचे २९० रुग्ण; अाराेग्य यंत्रणेवर फोडले खापर, अाैषधांचाही तुटवडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - डेंग्यूच्या अाजाराने थैमान घातले अाहे. जवळपास २९० रुग्ण सध्या बाधित अाहेत. अशा स्थितीत उपाय मात्र ताेकडे अाहेत. यावरूनच मंगळवारी आरोग्य विभाग टार्गेट झाला. औषधांचा तुटवडा असतो, रुग्णांना औषधे दिली जात नाही, मुदतबाह्य औषधे फेकली अथवा पुरवली जातात, रुग्णांची गैरसोय करण्यात आरोग्य विभाग पुढे आहे, पाहणी केल्यास गैरप्रकार उघडकीस येतील, असे अारोप करण्यात आले. तर दुसरीकडे खातेनिहाय आढावा बैठकीत सूचना देत नाही का, कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय नसतो का अशा शब्दात अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
जिल्हा परिषदेत मंगळवारी झालेली बैठक सुरुवातीपासून वादळी ठरली. सभेच्या सुरुवातीला अंगणवाडीचा विषय आला. अंगणवाड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अजूनही अनेक ठिकाणी अंगणवाडी नाही, इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीच्या स्पर्धेत अंगणवाडीनेही कात टाकली पाहिजे अशा सूचना केल्या जात होत्या. त्याला उत्तर देताना या विभागाचे प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. ए. तडवी यांनी ६५५ अंगणवाड्यांचे काम राहिले आहे. सन २०१६-१७च्या निधीतून कामे होत आहेत. मार्च २०१८ पर्यंत यातून कामे होतील, अशी माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. अरविंद मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. प्राथमिक आरोग्य विभागात वैद्यकीय सेवा दिली जात नाही, औषधांचा तुटवडा आहे, रुग्णांना औषधे दिली जात नाही, मुदतबाह्य औषधे फेकली अथवा जमिनीत गाडली जातात, रुग्णांना प्राथमिक उपचार करता ग्रामीण रुग्णालय अथवा धुळे रुग्णालयात पाठविले जाते, आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबद्दल सांगूनही अधिकारी लक्ष देत नाही, असे अारोप करण्यात आले. आरोप आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा खुलासा समाधानकारक वाटल्यामुळे खातेनिहाय बैठकीत माहिती घेत नाही का असा प्रश्न दहिते यांनी विचारला. कनिष्ठ अधिकारी एेकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही.

बैठकीला येण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचे वाटत नाही का, केवळ टाइमपास म्हणून बैठक घेतली जात नाही, अशा तिखट शब्दांमध्ये खडे बोल सुनावण्यात आले. शिवाय संयमी भूमिका घेऊन इतर सदस्यांचा रोष मावळण्याचाही प्रयत्न दहिते यांनी केला. सभेला अध्यक्ष शिवाजी दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण आरोग्य सभापती नूतन पाटील, महिला बालकल्याण सभापती वंदना गुजर, कृषी पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, सीईओ ओमप्रकाश देशमुख, डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित होते.

तुमच्या बैठकीत बोला...
सदस्यांचे प्रश्न, त्यावर विभागप्रमुखांना खुलासा विचारला जात असताना मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अध्यक्ष दहिते यांनी त्यांना रोखत प्रशासकीय स्तरावरील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करा, ही लोकप्रतिनिधी अर्थात आमची बैठक आहे. तुमच्या बैठकीत बोला, अशी सूचना केली. तर तत्पूर्वी डॉ. गुंडे यांनाही अशाच पद्धतीने उत्तर देऊन अध्यक्ष दहिते यांनी निरुत्तर केले. शिवाय विभागप्रमुखांनी जि.प. सदस्यांशी संवाद आणि कनिष्ठांशी समन्वय साधावा, असे म्हटले.

समिती करणार पाहणी...
काही जिल्ह्यांमध्ये फायबरनिर्मित अंगणवाड्या आहेत. त्यात बहुतांशी सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या कमी खर्चाच्या शिवाय वेळेत तयार होणाऱ्या आहेत. त्यांची पाहणी करून जिल्ह्यातही अशा अंगणवाडीची सोय करता येईल. त्यासाठी जि.प. सदस्य अधिकारी डॉ. गुंडे, रौंदळ तडवी यांचे संयुक्त पथक प्रत्यक्ष नाशिकला जाऊन पाहणी करतील, अशी सूचना करण्यात आली. तर काही सदस्यांनी यावर तोडगा सुचवत फायबर अंगणवाडीचे सॅम्पल मागवावे, पॉवर पाॅइंटने त्याचे सादरीकरण दाखवावे, अशी सूचना मांडली; परंतु समितीच्या प्रत्यक्ष पाहणीचे कारणे या वेळी सांगण्यात आली.

डेंग्यूचे २९० रुग्ण
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण किती या प्रश्नावरही आरोग्य अधिकारी डॉ. माेरे यांना विचारणा झाली. सद्य:स्थितीत धुळे शहर तालुक्यात १४६, शिंदखेड्यात ३२, शिरपूरला ३९ तर साक्रीत २९ रुग्ण आहेत. एकूण ४८६ रुग्णांची तपासणी झाली आहे. याशिवाय शहर परिसरात १४५ बाधित आहेत. एकूण २९० रुग्णांना बाधा झाली आहे. दरम्यान, आकडेवारीवर सदस्यांनी आक्षेप घेतला असता शासकीय प्रयोगशाळेचा दाखला देण्यात आला. तर काही सदस्यांनी यावर तोडगा म्हणून गावोगावी जनजागृतीसाठी प्रयत्न करावे, अशी सूचना मांडली. मात्र प्रत्येक गावात धुरळणी होऊ शकत नाही. त्यामुळे आजार वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...