आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश रुग्णांनी जळगावात दवाखाने फुल्ल; दोन महिन्यात 48 जणांना डेंग्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरासह जिल्हाभरात साथीच्या आजाराने पाय पसरवले आहेत. यात प्रामुख्याने व्हायरल फिवरचे (डेंग्यू व इतर) रुग्णासोबतच सर्दी, खोकला, टायफाईड, काविळच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. सरकारी यंत्रणेकडील आकडेवारी अत्यंत कमी असली तरी शहरातील सर्वच दवाखाने रुग्णांनी फुल्ल दिसत आहेत. डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार ‘कमबॅक’ करत मुक्काम ठोकल्याने त्याचा परिणाम साथीच्या आजारांवर झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डास प्रतिबंधाच्या दृष्टीने पालिकेने अद्याप कोणत्याही हालचाली सुरू केल्याचे दिसत नाही. झोपडपट्टी भागात आजारांचा फै लाव झाल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येईल असे दिसते.

सरकारी आकडे कमीच
महापालिकेकडे असलेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन महिन्यात केवळ 48 जणांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होते. परंतु ही आकडेवारी सध्या खासगी व सरकारी रुग्णालयातील रुग्णसंख्या पाहता अत्यंत कमी आहे. पालिका प्रशासनाचे कर्मचारी खासगी दवाखान्यात जाऊन रुग्णांची नोंद घेतात मात्र खासगी दवाखान्यातून देण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्याचा तर्क काढला जात आहे.

प्रशासनाने मोहीम राबविण्याची गरज
गेल्या वर्षी पावसाळ्यात हुडकोमध्ये सहा बालकांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासन जागे होऊन स्वच्छता व फवारणी मोहीम राबविली होती. परंतु यंदा अद्याप पालिका प्रशासनतर्फे काहीच हालचाली दिसत नाही.

असा होतो डेंग्यूचा प्रसार
डेंग्यू व्हायरसचे चार प्रकार असून रुग्णाला चार वेळा डेंग्यू होऊ शकतो. ‘एडीस इजिप्ती’ या डासांच्या चावण्यातून किंवा क्वचित ‘एडीस अँलोप्टीक्स’ या डासांमुळेसुद्धा डेंग्यू होतो. हा डास दिवसाच चावतो. त्यांची अंडी थंड व कोरड्या वातावरणात वर्षभर जिवंत राहू शकतात. डास माणसाच्या अंगावरील विशिष्ट रसायनांमुळे आकर्षित होतात. डासांची उत्पत्ती ही गवताळ व छोट्या वनस्पतीत साचलेले पाण्यात होते. त्यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णांना नवीन ठिकाणचे डास चावले अन् तेच डास निरोगी माणसास चावले तर संसर्ग हा चटकन पसरतो.

डेंग्यू तापची लक्षणे
रुग्णाला दिवसातून दोन वेळा ताप येतो. तसेच डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, घसा दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल पुरळ व मळमळ, भूक मंदावणे, पोटदुखीचा त्रास जाणवतो. डेंग्यू हिमरेजिकमुळे नाकातून रक्तस्राव, पोटात आतड्यांचा रक्तस्राव होतो.

असा करा उपचार
हा व्हायरल आजार असल्यामुळे त्यावर विशिष्ट उपचार नाही. ताप असल्यास आराम करावा, पाणी भरपूर प्यावे. ताक, फळांचा रस, दूध, ओआरएस घेतल्यास उत्तम. तापासाठी याशिवाय आजारपणात उपवास टाळावे.

काय म्हणतात डॉक्टर?

सिव्हिल, गोदावरीत हॉस्पीटलमध्ये गर्दी
सिव्हिलमधील ओपीडीच्या प्रमाणात वाढ झाली असून गर्दी दिसत आहे. तर गोदावरी हॉस्पिटलमध्ये दररोजच्या तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाणही नेहमीपेक्षा जास्त आहे. सद्या मलेरिया ज्वरचे रुग्ण जास्त येत आहेत. डेंग्यू निष्पन्न होत नसला तरी त्याची लक्षणे असलेले रुग्ण आढळत असल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू झाले आहेत. रुग्ण अँडमिट करून घेण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले असल्याचे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या डॉ. साजिया खान यांनी सांगितले.

लहान मुलांचे प्रमाण
वातावरणातील बदलाचा पहिला फटका लहान मुलांना बसला आहे. सर्दी खोकल्यासोबत कफ तयार होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. तापाचे रुग्ण वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील यांनी सांगितले.