आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामांच्या साइटवर साठवलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या फैलावाचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरासह जिल्हाभरात सध्या डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शहरातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत ते १५ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश सर्वच बालरोगतज्ज्ञांकडे डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. उपचारासाठी अॅडमिट होणाऱ्या रुग्णांसह ओपीडी वाढली आहे. पालिकेकडून मात्र याबाबत दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील झोपडपट्टी भागात कंटेनर सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. मात्र, डेंग्यूचा डास शुद्ध पाण्यात निर्माण होत असल्याने इतर भागांमध्येही सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र केवळ झोपडपट्टी भागातच कागदोपत्री सर्वेक्षण केले जाते. यासह जिल्हा प्रशासनाकडून डेंग्यूच्या रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाच्या निवासस्थान परिसरापुरते सर्वेक्षण केले जाते. मुळात पालिकेने डेंग्यूबाबत शहरात प्रबोधन करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही याबाबत उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील अंतर्गत आणि विस्तारित भागांमध्ये अनेक ठिकाणी इमारत घरांचे बांधकाम सुरू आहे.
बांधकामाला लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी हौद बांधले जातात. या हौदांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचत आहे. झाकण नसल्याने हे हौद उघडे असतात. यामुळे डेंग्यूच्या ऐडिस इजिप्ती डासांची पैदास वाढत आहे. पालिकेने आता केवळ कंटेनर सर्वेक्षणात वेळ घालवता बांधकामांच्या साइटवर जाऊन पाहणी करावी, तसेच पाणी साठवलेले हौद रिकामे करून कोरडा दिवस पाळणे, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी हौदात गप्पी मासे सोडणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. या उपायांबाबत पालिकेने शहरात त्वरित जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.
^बालकांमध्ये डेंग्यूचेप्रमाण अधिक आहे. डासांची उत्पत्ती थांबवणे, कोरडा दिवस पाळणे, घरात मच्छर अगरबत्ती डास प्रतिबंधकांचा वापर करणे तसेच संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे वापरावेत. डेंग्यूवर सहज उपचार होत असल्याने भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. डॉ.पंकज राणे, बालरोगतज्ज्ञ, भुसावळ

जागोजागी अस्वच्छतेचा कळस
शहरात डेंग्यूसोबत आता साथरोगही बळावत आहेत. शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. पालिकेकडून नियमित स्वच्छता होत नाही. तर दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे जलजन्य आजारांचा झपाट्याने फैलाव होत आहे. यासह सर्दी, अंगदूखी, खोकल्याचे रुग्ण शहरात अधिक आहेत.

नागरिकांमध्ये जनजागृती शून्य
जिल्ह्यात डेंग्यूच्या बळींची संख्याही वाढत असताना पालिकेकडून उपापयोजना होत नाहीत. या दरम्यान कंटेनर सर्वेक्षण तर सोडाच केवळ जनजागृतीदेखील होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसल्याचे स्पष्ट होते. पालिकेने जनजागृतीसाठी घडीपत्रके छपाई करून त्यांच्या वितरणाचेही नियोजन केले नाही.

प्लॉटधारकांना पालिकेने सूचना देणे आवश्यक
शहरातील अनेक रस्ते खड्डेमय आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यास ही उत्पत्ती थांबवता येईल. विस्तारित भागांमध्ये ओपन स्पेसमध्येही गवत वाढले असून पाणी साचून राहते. मात्र, पालिकेने ओपन स्पेसवरील गवत काढणे, खासगी मोकळ्या प्लॉटच्या मालकांना नोटीस देऊन स्वच्छता करण्याबाबत उपाययोजना केलेली नाही. अशा जागांवर उत्पत्तीला चालना मिळते, म्हणून स्वच्छता होणे आवश्यक ठरते.
जिल्हाभरात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असूनही पालिकेने शहरातील उपाययोजनांना गती दिलेली नाही. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील झोपडपट्टी भागात कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले अाहे. तरी शहरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा केला जात आहे. अनेक महिन्यांपासून साठवलेल्या पाण्यात डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात डेंग्यूच्या फैलावाचा धोका वाढला आहे. या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन, उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...